बारामती पोटनिवडणुकीत : जय पवार यांच्या भाषणाने सभागृह द्रवले
पुणे, 21 एप्रिल (हिं.स.) : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा समारोप होत असताना आयोजित सांगता सभेत एक हृदयस्पर्शी प्रसंग पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा यांच्या प्रचारसभेत जय पवार यांनी आपल्या भाषणातून वडील अजित पवार यांच्या आठवणींन
बारामती पोटनिवडणुकीत : जय पवार यांच्या भाषणाने सभागृह द्रवले


पुणे, 21 एप्रिल (हिं.स.) : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा समारोप होत असताना आयोजित सांगता सभेत एक हृदयस्पर्शी प्रसंग पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा यांच्या प्रचारसभेत जय पवार यांनी आपल्या भाषणातून वडील अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक आवाहन केले.

“काय रे जय, कसा झाला दौरा?” असे विचारणारा तो आपुलकीचा आणि खंबीर आवाज आता सोबत नसल्याची जाणीव करून देताना जय पवार यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या या भावनिक क्षणाने उपस्थित जनसमुदायही हेलावून गेला.

आपल्या भाषणात जय पवार यांनी अजित पवार यांच्या कणखर आणि स्पष्ट स्वभावाचा उल्लेख केला. “दादांचा स्वभाव ठाम होता. ते नेहमी सांगायचे – ‘जयड्या, संकटं कितीही मोठी असली तरी रडायचं नाही, तर पूर्ण ताकदीने लढायचं’,” असे सांगताना त्यांनी वडिलांकडून मिळालेल्या शिकवणीची आठवण करून दिली. या शब्दांतून सध्याच्या कठीण काळात पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दादांच्या अनुपस्थितीत ही निवडणूक लढवणे किती आव्हानात्मक आहे, याची जाणीव त्यांच्या भाषणातून स्पष्टपणे जाणवत होती. त्यांनी या प्रचाराला केवळ राजकीय प्रक्रिया न मानता कौटुंबिक नात्यांची जपणूक असल्याचे सांगितले.“हा प्रचार केवळ माझ्या आईसाठी नाही, तर बारामतीतील माझ्या कुटुंबासाठी आहे. बारामती ही दादांची कर्मभूमी असून, येथील प्रत्येक नागरिक आमचा नातेवाईक आहे,” असे सांगत त्यांनी मतदारांशी असलेले भावनिक नाते अधोरेखित केले.सभेच्या शेवटी जय पवार यांनी मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. त्यांच्या या भावनिक भाषणामुळे सांगता सभेला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले.

-----------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande