महिला आरक्षण : रोहिणी खडसेंकडून मुख्यमंत्र्यांना थेट चर्चेचे आव्हान
जळगाव, 21 एप्रिल (हिं.स.) : महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट चर्चेचे आव्हान दिले आहे. “समोरासमोर बसून चर्चा करूया आणि ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होऊ द्या
रोहिणी खडसे


जळगाव, 21 एप्रिल (हिं.स.) : महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट चर्चेचे आव्हान दिले आहे. “समोरासमोर बसून चर्चा करूया आणि ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होऊ द्या,” असा टोला त्यांनी लगावला.

खडसे यांनी सांगितले की, 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून या विषयावर कोणाचाही मूलभूत विरोध नाही. मात्र, सत्ताधारी भाजपा महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून विरोधकांविषयी संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

“भाजपची सत्ता असताना मोर्चे काढून काय साध्य होणार?” असा सवाल करत त्यांनी मणिपूर मधील महिलांवरील घटनांचा उल्लेख केला. तसेच महाराष्ट्रातही महिला अत्याचाराच्या घटना वाढत असल्याची टीका त्यांनी केली.

याशिवाय, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकाळात महिलांना अधिक नेतृत्वाच्या संधी मिळाल्याचा दावा करत, “भाजपने किती महिलांना नेतृत्व दिले, याचा हिशेब द्यावा,” अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर खुल्या चर्चेसाठी मुख्यमंत्री पुढे येतील का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande