
- उद्धव ठाकरेंच्या नावाचा सस्पेन्स संपुष्टात
मुंबई, 29 एप्रिल (हिं.स.) - आगामी काळात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा होण्यास सुरुवात झाली असून भाजपकडून सहा उमेदवारांची मंगळवारी घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांचं नाव विधान परिषदेचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात येत असल्याचे नेते आदित्य ठाकरे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंचं नाव चर्चेत होतं. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून त्यांनाच आग्रह केला जात होता. मात्र, आता अंबादास दानवे ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार हे निश्चित झालं आहे. दरम्यान काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पक्षाकडून उमेदवार दिला जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे.
विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 9 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.
भाजपकडून विधान परिषदेसाठी 6 उमेदवारांची यादी
दरम्यान, कालच भाजपने विधान परिषदेसाठी 6 उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपच्या संसदीय कमिटीच्या मान्यतेनंतर भाजपने अधिकृतपणे महाराष्ट्रातील 5 विधानपरिषदांच्या जागेसाठी पाच नावांची घोषणा केली. तर, विधानपरिषदेच्या एका पोटनिवडणुकीसाठी एक म्हणजेच एकूण 6 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार आणि प्रज्ञा सावंत यांचा समावेश आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
मतदानाची तारीख: 12 मे 2026
मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी