
अमरावती, 30 एप्रिल (हिं.स.)।
आगामी १६ व्या राष्ट्रीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात शिक्षकांचे प्रशिक्षण वेगाने सुरू असून, जनगणनेसाठी वापरण्यात येणाऱ्या मोबाईल अॅपसाठी किमान अॅण्ड्रॉइड १२ किंवा त्यापुढील आवृत्ती ही अट अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांचे विद्यमान मोबाईल या आवश्यकतेस अपुरे ठरत असून, नव्याने मोबाईल खरेदी करण्याचा आर्थिक बोजा त्यांच्यावर पडत आहे. शासनाच्या धोरणांतर्गत शिक्षकांना स्वतःच्या मोबाईलवरच जनगणनेचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे शासनाकडून साधनसामग्री उपलब्ध न करून देता जबाबदारी शिक्षकांवर टाकली जात असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. अमरावती जिल्ह्यासह विविध तालुक्यांमध्ये सध्या जनगणना प्रशिक्षण सुरू असून, या प्रक्रियेत शिक्षकांना संपूर्ण डिजिटल प्रणाली समजावून सांगितली जात आहे. प्रत्येक शिक्षकाला ठराविक क्षेत्र देण्यात येणार असून, उन्हाळी सुटीत घरोघरी जाऊन माहिती संकलन करावी लागणार आहे. ही जनगणना प्रक्रिया १५ मे ते १६ जूनदरम्यान राबविली जाणार आहे. यामध्ये कुटुंबातील सदस्यांची संख्या, वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय, स्थलांतर, निवासस्थिती यासह विविध माहिती मोबाईल अॅपमध्ये नोंदवावी लागणार आहे. तसेच घराचे जीपीएस लोकेशन, घराचा प्रकार, पाणी, वीज, शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधांची माहिती आणि काही ठिकाणी घरांचे फोटो अपलोड करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या सर्व प्रक्रियेसाठी अद्ययावत मोबाईल, चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि सॉफ्टवेअर क्षमता आवश्यक असल्याने शिक्षकांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. प्राथमिक शिक्षक समितीने जनगणना संचालक नीरूपमा डांगे यांना निवेदन देऊन जनगणनेसाठी आवश्यक अॅण्ड्रॉइड १२ किंवा आठ जीबी रॅम असलेले मोबाईल उपकरण शासनाने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी