बंद पडलेली खरेदी केंद्रे तात्काळ सुरु करा : आमदार राजेश विटेकर
परभणी, 30 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यातील शासनाच्या खरेदी केंद्रांचे ऑनलाइन पोर्टल बंद करण्यात आल्याने रब्बी हंगामातील हरभरा खरेदी प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे बंद पडलेली खरेदी केंद्रे तात्काळ पुन्हा सुरू करण्यात यावीत, अशी मागणी राजेश विटेकर
बंद पडलेली खरेदी केंद्रे तात्काळ सुरु करा : आमदार राजेश विटेकर


परभणी, 30 एप्रिल (हिं.स.)।

जिल्ह्यातील शासनाच्या खरेदी केंद्रांचे ऑनलाइन पोर्टल बंद करण्यात आल्याने रब्बी हंगामातील हरभरा खरेदी प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे बंद पडलेली खरेदी केंद्रे तात्काळ पुन्हा सुरू करण्यात यावीत, अशी मागणी राजेश विटेकर यांनी जयकुमार रावल यांची भेट घेऊन केली. या वेळी पणन मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका दर्शविल्याने शेतकर्यांमध्ये पुन्हा आशा निर्माण झाल्या आहेत.

शासनाने खरेदीसाठीचे ऑनलाइन पोर्टल अचानक बंद केल्यामुळे नाफेड मार्फत सुरू असलेली हमीभाव खरेदी थांबविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकार्यांनी दिली आहे. यामुळे जिल्हाभरातील विविध खरेदी केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी आलेल्या शेतकर्यांची मोठी गैरसोय होत आहे. यंदाचे शासनाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत ही केंद्रे बंद करण्यात आल्याचे समजते.

जिल्ह्यातील एकूण 4281 शेतकर्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ 1935 शेतकर्यांच्या हरभर्याची खरेदी करण्यात आली आहे. हरभरा विक्रीसाठी आलेले हजारो शेतकरी 45 अंश तापमानात वाहनखर्चाचा भुर्दंड सहन करत खरेदी केंद्रे सुरू होण्याची वाट पाहत थांबलेले दिसत आहेत, हे चित्र अत्यंत वेदनादायक ठरत आहे. पोर्टल बंद झाल्यामुळे उर्वरित 2,346 नोंदणीकृत शेतकरी खरेदीपासून वंचित राहिले असून, शासनाने प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच निर्णय घेतल्याने शेतकर्यांना आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नोंदणीकृत सर्व शेतकर्यांच्या हरभर्याची खरेदी पूर्ण करण्यासाठी खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करून शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी राजेश विटेकर यांनी केली आहे. दरम्यान, जयकुमार रावल यांनीही लवकरच केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा सुरू असल्याची माहिती दिली असून, त्यामुळे शेतकर्यांच्या हरभरा खरेदीबाबत आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande