
परभणी, 30 एप्रिल (हिं.स.)।शहरातील त्रिमूर्तीनगर येथील एक महिला भाविक मारुती मंदिरात दर्शन घेऊन परत येत असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे तब्बल ७० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केल्याची घटना सुमारास घडली.
त्रिमूर्तीनगर येथील एक महिला भाविक नेहमीप्रमाणे परिसरातील मारुती मंदिरात दर्शनासाठी गेली होती. मंदिरात दर्शन घेऊन परत येत असताना आनंद किराणा दुकान परिसरात समोरून आलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगाने महिलेच्या मानेला जोराचा धक्का लागल्याने महिला जमिनीवर पडली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दुचाकीस्वाराला थांबविण्याचा प्रयत्न केला असता दुचाकीस्वार सुसाट पळून गेले. दरम्यान, दुचाकीवरील मागे बसलेला व्यक्ती अंदाजे ३० - ३५ वयाचा असून त्याने निळा रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातली होती. तर दुचाकीचालक अंदाजे ३० - ३५ वर्ष वर्षाचा असून त्याने पुर्ण बाह्यांचा पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी संबंधित महिला भाविकाच्या फिर्यादीवरून दुचाकीवरील अज्ञात दोघांविरुद्ध नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ हे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis