
सोलापूर, 09 एप्रिल (हिं.स.)। भवानी नगर व मंगळवार पेठ वस्तीच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या वेळी आयोजकांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभर विविध ठिकाणी हिंदू समाजाला संघटित, सशक्त व जागृत करण्याच्या उद्देशाने अशा संमेलनांचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमातून समाजामध्ये एकात्मता, संस्कार, राष्ट्रीय भावना व सामाजिक बांधिलकी दृढ करण्याचा प्रयत्न होणार आहे. तसेच सर्व घटकांना एकत्र आणून सामाजिक समरसता प्रस्थापित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. श्रीरंग गहिनीनाथ महाराज औसेकर (श्रीनाथ संस्थान), हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई जयराम देसाई तसेच डॉ. सचिनजी लादे यांची उपस्थिती लाभणार असून, ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमात पारंपरिक युद्धकला प्रात्यक्षिके, लाठी-काठी व दांडपट्टा सादरीकरण यांसह महापुरुषांच्या वेशभूषेत लहान बालकांचा सहभाग हे विशेष आकर्षण ठरणार आहे.हे भव्य हिंदू संमेलन दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता बाळीवेस (विजय) चौक, सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन हिंदू संमेलन समितीचे अध्यक्ष योगेश पिरचंद सलगर, कार्याध्यक्ष सचिन अशोक कुलकर्णी, तसेच शिवानंद सावळगी, श्रीशैल विभूते, देविदास चेळेकर व रवि गोणे यांनी केले आहे. याबाबतची माहिती कार्याध्यक्ष सचिन अशोक कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड