
सोलापूर, 09 एप्रिल (हिं.स.)।जगतज्योती श्री महात्मा बसवेश्वर जयंती मिरवणुकीसाठी रात्री १२ वाजेपर्यंत पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील आणि मध्यवर्ती महामंडळाचे समिती अध्यक्ष शरणराज केंगनाळकर यांनी बुधवारी दिली.
बुधवारी सकाळी मध्यवर्ती श्री महात्मा बसेश्वर जन्मोत्सव महामंडळाचे पदाधिकारी आणि पोलीस प्रशासनाची पोलीस आयुक्तालयात चर्चा झाली. यावेळी महात्मा बसवेश्वर जयंती आणि मिरवणूक काढण्याबाबत येणाऱ्या अडचणी आणि उपाय यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील यांनी मिरवणुकीची वेळ रात्री १२ वाजेपर्यंत वाढवून देण्याची मागणी केली. तसेच श्री महात्मा बसवेश्वर जयंती मिरवणूक काढणाऱ्या मंडळांनी प्रशासनाकडे परवानगी मागताना मध्यवर्ती महामंडळाचे शिफारस पत्र जोडावे आणि जी मंडळे मिरवणूक न काढता केवळ मंडपात मूर्ति प्रतिमा स्थापन करून जयंती साजरी करतात अशा मंडळांनीही परवानगी काढताना मध्यवर्ती महामंडळाचे शिफारस पत्र सोबत जोडावे, असे ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील यांनी सांगितले.मंडळांच्या सोयीसाठी पोलीस प्रशासनाने महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवासाठीच्या परवानगीकरिता एक खिडकी योजना सुरू करावी अशी मागणी समितीचे अध्यक्ष शरणराज केंगनाळकर यांनी यावेळी केली. या सर्व मागण्यांना पोलीस प्रशासनाने हिरवा कंदील दाखवत सकारात्मक प्रतिसाद दिला.यावेळी मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील, मध्यवर्ती महामंडळाचे समिती अध्यक्ष शरणराज केंगनाळकर, कार्याध्यक्ष विजय कुलथे, सचिव बसवराज सावळगी, उपाध्यक्ष केदार वनारोटे, खजिनदार अनिल परमशेट्टी, ट्रस्टी गणेश चिंचोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड