इराण युद्धात पाकिस्तानच्या मध्यस्थीवर अमेरिकेलाही संशय
वॉशिंग्टन, 12 मे (हिं.स.)।पश्चिम आशियातील संघर्षात पाकिस्तान स्वतःला मध्यस्थ म्हणून सादर करत आहे, मात्र त्याच्या या भूमिकेबाबत आता अमेरिकन प्रशासनाला गंभीर संशय येऊ लागला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते पाकिस्तान दुहेरी खेळ खेळत आहे. राष्ट्राध्यक्ष
इराण युद्धात पाकिस्तानच्या मध्यस्थीवर अमेरिकेलाही संशय


वॉशिंग्टन, 12 मे (हिं.स.)।पश्चिम आशियातील संघर्षात पाकिस्तान स्वतःला मध्यस्थ म्हणून सादर करत आहे, मात्र त्याच्या या भूमिकेबाबत आता अमेरिकन प्रशासनाला गंभीर संशय येऊ लागला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते पाकिस्तान दुहेरी खेळ खेळत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने पाठवलेला शांतता प्रस्ताव पूर्णपणे फेटाळून लावला आहे. हा प्रस्ताव पाकिस्तानमार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला होता. अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेच्या फेऱ्यांचे यजमानपदही पाकिस्ताननेच भूषवले होते.

रिपोर्टनुसार, ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांना इराण-अमेरिका चर्चेत पाकिस्तानच्या मध्यस्थीबाबत चिंता वाटत आहे. अमेरिकन प्रशासनाला असे वाटते की पाकिस्तान शांतता प्रक्रियेबाबत ट्रम्प यांची नाराजी योग्य प्रकारे इराणपर्यंत पोहोचवत नाही. तसेच, पाकिस्तान इराणची भूमिका प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा अधिक सकारात्मक दाखवून अमेरिकेसमोर मांडत असल्याचाही अधिकाऱ्यांचा आरोप आहे. दरम्यान, अमेरिकन माध्यमांच्या एका रिपोर्टमध्ये पाकिस्तानच्या या दुहेरी भूमिकेचा आणखी एक पुरावा समोर आल्याचे म्हटले आहे.रिपोर्टनुसार, पाकिस्तानने गुप्तपणे इराणी लष्करी विमानांना आपल्या विमानतळांवर थांबण्याची परवानगी दिली होती. अमेरिकन हवाई हल्ल्यांपासून या विमानांचे संरक्षण करण्यासाठीच हे करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की एप्रिलच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी इराणसोबत युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर काही दिवसांतच इराणने पाकिस्तानच्या ‘नूर खान एअर बेस’वर अनेक विमाने पाठवली होती. यामध्ये इराणी वायुदलाचे गुप्तचर विमान ‘आरसी-130’चाही समावेश होता.

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन यांच्या अलीकडील वक्तव्यांमुळेही हा अविश्वास अधिक वाढला आहे. त्यांनी म्हटले की इराणकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ते सन्मानपूर्वक चर्चा करू शकतात किंवा युद्धाचाही मार्ग स्वीकारू शकतात. पेझेशकियन यांनी लष्करी ताकदीच्या बळावर कूटनीती करण्याची भूमिकाही मांडली. दुसरीकडे, ट्रम्प यांनी इराणच्या भूमिकेवर कठोर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी इराणच्या प्रस्तावाला “कचरा” असे संबोधत तो पूर्णपणे वाचण्याचीही गरज वाटली नसल्याचे म्हटले. ट्रम्प यांच्या मते, इराण सध्या अत्यंत कमकुवत स्थितीत असून सध्याचा युद्धविराम संपुष्टात येण्याच्या उंबरठ्यावर आहे.

इराणला लष्करीदृष्ट्या पराभूत केल्याचा दावा पुन्हा करताना ट्रम्प म्हणाले की युद्धविरामाच्या काळात इराणने जे काही उभारले असेल, ते अमेरिका एका दिवसात उद्ध्वस्त करू शकते. या सर्व घडामोडींमध्ये आता ट्रम्प चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेण्यासाठी बीजिंगला रवाना होत आहेत. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आता चीन महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande