
हिंगोली, 13 मे (हिं.स.)।
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वरुग्णालय, हिंगोली यांच्या वतीने भारत सरकारच्या “अटल वयो अभ्युदय योजना” (राष्ट्रीय वयोश्री योजना) अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व सहाय्यक उपकरणे वाटपासाठी नाव नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. २१ मे २०२६ रोजी गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, हिंगोली येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये पात्र लाभार्थ्यांना गरजेनुसार व्हीलचेअर, श्रवणयंत्र, चष्मे, वॉकर, काठ्या, कमोड चेअर तसेच कृत्रिम दात (कवळी) यांसारखी सहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक पात्र लाभार्थ्यास अंदाजे १२ हजार ५०० रुपये पर्यंतच्या साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी लाभार्थ्यांचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. तसेच लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) धारक असावा किंवा त्यांचे मासिक उत्पन्न रु. १५ हजारांपेक्षा कमी असावे. यासाठी तहसीलदार यांचे उत्पन्न प्रमाणपत्राच्या दोन छायांकित प्रती, आधार कार्डाच्या दोन छायांकित प्रती तसेच दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक राहणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पूर्व नोंदणीसाठी दत्तात्रय मगर, समाजसेवा अधीक्षक, मो. ९३७३३७०७२२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis