खरीप हंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पीकस्पर्धेचा निकाल जाहीर
छत्रपती संभाजीनगर, 13 मे (हिं.स.)। राज्यामध्ये विविध पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या उद्देशाने राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत खरीप ह
खरीप हंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पीकस्पर्धेचा निकाल जाहीर


छत्रपती संभाजीनगर, 13 मे (हिं.स.)।

राज्यामध्ये विविध पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या उद्देशाने राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन २०२५ मध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या ११ पिकांसाठी राज्यस्तरीय पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पीकस्पर्धेसाठी तालुका हा मूलभूत घटक मानण्यात येतो. स्पर्धेत सहभागी शेतकऱ्यांची उत्पादकता विचारात घेऊन राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर पुरस्कार प्रदान करण्यात येतात. ज्या शेतकऱ्यांच्या पिकाची उत्पादकता संबंधित तालुक्याच्या त्या पिकाच्या मागील पाच वर्षांच्या सरासरी उत्पादकतेच्या दीडपट किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा शेतकऱ्यांना पीकस्पर्धेतील पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येते.

खरीप हंगाम सन २०२५ पीकस्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पीकस्पर्धा निकाल समितीद्वारे जाहीर करण्यात आले आहेत.

राज्यस्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते वगळून जिल्हास्तरीय पीकस्पर्धा निकाल समितीमार्फत संबंधित जिल्ह्यातील स्पर्धकांमधून पीकनिहाय सर्वसाधारण व आदिवासी गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर तालुकास्तरीय समितीमार्फत संबंधित तालुक्यातील स्पर्धकांमधून तालुकास्तरीय विजेत्यांची निवड करून निकाल घोषित करण्यात येतील.

पीकस्पर्धेमध्ये उच्चतम उत्पादकता प्राप्त करणाऱ्या विजेत्या शेतकऱ्यांनी अवलंबिलेल्या आधुनिक पीक पद्धती व तंत्रज्ञानाची माहिती घडीपत्रिका तसेच विविध प्रचार-प्रसार माध्यमांद्वारे इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील कृषी उत्पादन वाढीस चालना मिळून इतर शेतकऱ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रेरणा मिळणार असल्याचे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande