
छत्रपती संभाजीनगर, 13 मे (हिं.स.)।कृषी विज्ञान केंद्र बदनापूर येथे तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा नियोजन बैठक 2026-27 आमदार नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते, वीजपुरवठा, सिंचन, पीक विमा, कृषी मार्गदर्शन तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान शेतकऱ्यांच्या अडचणी, नैसर्गिक बदलांमुळे निर्माण होणारी आव्हाने तसेच उत्पादनवाढीसाठी आवश्यक नियोजन यावर सकारात्मक विचारमंथन करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना वेळेत मदत पोहोचविण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
या बैठकीस भाजपा सरचिटणीस अनिलराव कोलते, विभागीय अधिकारी जालान रामदास दौंड, विभागीय कृषी अधिकारी जालान प्रशांत पवार, तहसीलदार बदनापूर तेजस्विनी जाधव, तालुका कृषी अधिकारी गोपाल गुजर, गणेश कोल्हे, जगन्नाथ बारगाजे, पुरुषोत्तम जोशी तसेच विविध विभागांचे शासकीय अधिकारी, कृषी तज्ज्ञ आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असून, खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि कृषी विभाग समन्वयाने कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis