
* अनेक वर्षांपासूनच्या सुराज्य अभियानच्या मागणीला यश !
मुंबई, 13 मे (हिं.स.) - महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळच्या दरापेक्षा केवळ ५० टक्के अधिक तिकिट दर घेण्याचा शासन निर्णय असतांना उन्हाळी सुट्टी, गणेश चतुर्थी, दिवाळी आदी महत्त्वाच्या प्रसंगी गावी जातांना सामान्य नागरिकांची खाजगी प्रवासी बस वाहतूकदार, तसेच ऑनलाईन खाजगी प्रवासी ॲप अव्वाच्या सव्वा दर आकारून प्रचंड लुटमार करतात. त्याला चाप लावण्यासाठी राज्यशासनाने कायदा करण्याचे ठरवले असून येत्या अधिवेशनामध्ये हा कायदा मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे स्पष्ट आश्वासन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदु जनजागृती समिती प्रणित 'सुराज्य अभियाना'च्या शिष्टमंडळाला दिले.
मंत्रालयात परिवहन विभागाशी संबंधित विविध विषयांवरील आयोजित बैठकीत परिवहनमंत्री श्री. प्रताप सरनाईक, परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाचे अधिकारी, तसेच हिंदु जनजागृती समितिचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, सुराज्य अभियानाचे महाराष्ट्र समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे, समन्वयक डॉ. अंजेश कणगलेकर, श्री. सतिश सोनार, श्री. रवी नलावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळच्या दरापेक्षा केवळ ५० टक्के अधिक तिकिट दर घेण्याचा शासन निर्णय काही वर्षांपूर्वी घेण्यात आला होता; मात्र या शासन निर्णयाची अपेक्षित अंमलबजावणी होत नसल्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा लाभ होत नव्हता. त्यातच प्रवासी वाहतूकीचा व्यवसाय करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुमती न घेता बेकायदेशीर ॲग्रीगेटरचा व्यवसाय करणार्या ‘मेक माय ट्रीप’, ‘रेड बस’, ‘गोआयबिबो’, ‘सवारी’, ‘इन ड्राईव्ह’, ‘रॅपीडो’, ‘क्वीक राईड’, ‘रॅपीडो’ अशा एकूण १८ खाजगी प्रवासी ॲप बंद करण्याची सूचना पुणे येथील प्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी ६ मार्च २०२४ या दिवशी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. त्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी या वेळी सुराज्य अभियानाच्या वतीने करण्यात आली.
त्यावर परिवहनमंत्री श्री. सरनाईक यांनी वरील वस्तुस्थिती मान्य करत ते म्हणाले की, शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात काही अडचणी प्रशासनाला येत आहे. या संदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी सहपरिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील तीन प्रतिनिधींचा समावेश असलेली विशेष समिती गठित करण्यात येईल. समस्येचा अभ्यास करून राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. तसेच या संदर्भात कारवाई करण्यासाठी कायदा करण्यात येईल. तो येत्या विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये मांडण्याचा आमचा प्रयत्न राहिल.
या वेळी महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या बस आगारातील ७० टक्के दूरध्वनी सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना एस.टी. सेवेचा अपेक्षित लाभ मिळत नाही, या समस्येवर परिवहनमंत्री श्री. सरनाईक यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या प्रमाणात टोलफ्री क्रमांक चालू करण्याचे आदेश दिले. तसेच मुंबईतील बेस्ट बसेसमध्ये मराठी भाषेत असणाऱ्या सूचना लिहितांना त्यात शुद्धलेखन आणि व्याकरण यांच्या खूप ढोबळ चुका झालेल्या आहेत. अशाच प्रकारे एस.टी. महामंडळाच्या बसेसमध्ये लिखाणातील शुद्धलेखनाच्या चुका सुधारण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या वेळी एस.टी. बसस्थानक स्वच्छ व नीटनेटके ठेवण्यासाठी २ टक्के अधिभार मंडळ घेत आहे. त्यातून प्रवाशांना स्वच्छ बसस्थानक, चांगले पाणी, प्रसाधनगृह, तसेच एस.टी. वाहक व चालक यांना चांगली सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी माहिती मा. परिवहनमंत्री यांनी दिली.
या वेळी सुराज्य अभियान गेल्या काही वर्षांपासून परिवहन विभागाच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी निष्काम भावाने प्रयत्न करत असल्याच्या प्रयत्नांचे कौतुक करत सुराज्य अभियानाच्या अभ्यासाचा परिवहन विभागाला लाभ होईल, असे गौरवोद्गार परिवहनमंत्री यांनी काढले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी