

रायगड, 17 मे (हिं.स.)। उम्मत फाउंडेशन नेरळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “करिअर गाईडन्स अँड फेलिसिटेशन सेरेमनी” हा कार्यक्रम येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. एसएससी व एचएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांसह पालकांनीही या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमासाठी शिक्षणतज्ज्ञ व 17 शैक्षणिक पुस्तकांचे लेखक डॉ. मुबारक कापडी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना NEET, JEE, UPSC, CAT, NATA यांसारख्या स्पर्धा परीक्षांची माहिती, करिअरच्या विविध संधी, अभ्यासाचे नियोजन, स्मरणशक्ती वाढविण्याचे तंत्र तसेच परीक्षेच्या तणावावर मात करण्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी अँग्लो स्कूल नेरळ, विद्या मंदिर नेरळ, फैज इंग्लिश स्कूल दामत, सुमय्या इंग्लिश स्कूल दामत, दारुल उलूम इमाम-ए-रब्बानी, हाजी लियाकत इंग्लिश स्कूल, व्ही. वाय. कोहारी स्कूल, एल.ई.एस. नेरळ आणि पोशिरे स्कूल येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
असरा आसिफ शेख (95.60%), नाशरा जाहिद खान (93%), नाफिया जैद नजे (91.40%), विद्या मंदिर नेरळच्या विराज सुनील पवार (95.80%), अनुष्री विजय मळेकर (93.40%), जान्हवी मधुकर म्हस्कर (93.40%) तसेच एलईएएस नेरळच्या सयली शशिकांत मुंढे (97%) आणि नुपूर प्रमोद गाडे (95.6%) यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह पालकांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सोशल मीडियाचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम, अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व आणि सरासरी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याबाबत महत्त्वपूर्ण विचार मांडण्यात आले.
खुल्या प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी करिअर, स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणासंदर्भातील विविध प्रश्न विचारले. डॉ. कापडी यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे सविस्तर निरसन केले.यावेळी अध्यक्ष अलकाश मुल्ला, उपाध्यक्ष आफान नजे, सचिव मुजम्मील मनियार आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)