कोटेक हेल्थकेअर आणि दीपा ज्वेलर्सला आयपीओसाठी सेबीची मंजुरी
मुंबई, 24 मे (हिं.स.)। भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मोठी आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. औषधनिर्मिती क्षेत्रातील उदयोन्मुख कंपनी कोटेक हेल्थकेअर आणि दागिने व्यवसायातील प्रसिद्ध कंपनी दीपा ज्वेलर्स यांना भांडवली बाजार नि
New IPO Launching Listing


मुंबई, 24 मे (हिं.स.)। भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मोठी आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. औषधनिर्मिती क्षेत्रातील उदयोन्मुख कंपनी कोटेक हेल्थकेअर आणि दागिने व्यवसायातील प्रसिद्ध कंपनी दीपा ज्वेलर्स यांना भांडवली बाजार नियामक भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीकडून प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्रीसाठी म्हणजेच आयपीओ आणण्यास मंजुरी मिळाली आहे. सेबीने यासंदर्भात अधिकृत माहिती जाहीर केली असून त्यामुळे प्राथमिक बाजारात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

बाजारातील नियमांनुसार, या दोन्ही कंपन्यांना १८ मे २०२६ रोजी सेबीकडून अंतिम निरीक्षणे प्राप्त झाली होती. शेअर बाजाराच्या भाषेत ही अंतिम निरीक्षणे म्हणजे आयपीओ बाजारात आणण्यासाठी मिळालेला अधिकृत हिरवा कंदील मानला जातो. यापूर्वी कोटेक हेल्थकेअरने सप्टेंबर २०२५ मध्ये तर दीपा ज्वेलर्सने डिसेंबर २०२५ मध्ये आपले मसुदा दस्तऐवज सेबीकडे सादर केले होते.

कोटेक हेल्थकेअरच्या आयपीओअंतर्गत २९५ कोटी रुपयांचे नवीन समभाग जारी करण्यात येणार आहेत. याशिवाय विद्यमान भागधारकांकडून ६० लाख इक्विटी समभागांची विक्री प्रस्तावाच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की, या आयपीओमधून मिळणाऱ्या निधीपैकी सुमारे २२६.२५ कोटी रुपये नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी, विद्यमान उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी तसेच नवीन उत्पादनांच्या संशोधन आणि निर्मितीसाठी वापरले जाणार आहेत. उर्वरित निधी सामान्य कॉर्पोरेट कामकाजासाठी वापरण्यात येणार आहे.

दुसरीकडे, किरकोळ आणि घाऊक दागिने व्यवसायात कार्यरत असलेल्या दीपा ज्वेलर्सचा आयपीओ २५० कोटी रुपयांच्या नवीन समभाग विक्रीसह १ कोटी १८ लाख ४८ हजार ३४० समभागांच्या विक्री प्रस्तावाचा समावेश असलेला आहे. या विक्री प्रस्तावामध्ये कंपनीचे प्रमुख प्रवर्तक अशोक अग्रवाल आणि सीमा अग्रवाल हे आपले काही समभाग खुले बाजारात विकणार आहेत. कंपनी या निधीचा उपयोग व्यवसाय विस्तार आणि कार्यकारी भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करणार आहे.

बाजार तज्ज्ञांच्या मते, सेबीची मंजुरी मिळाल्यानंतर या दोन्ही कंपन्या जून २०२६ च्या सुरुवातीच्या आठवड्यात आयपीओचा किंमत पट्टा आणि समभाग विक्रीची तारीख जाहीर करू शकतात. दोन्ही कंपन्यांचे समभाग मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारावर सूचीबद्ध होणार आहेत. सध्या बाजारातील तरलता आणि गुंतवणूकदारांचा वाढता उत्साह पाहता या दोन्ही आयपीओकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande