
अमरावती, 25 मे (हिं.स.) प्रभाग क्र. १ मधील भाग्योदय कॉलनी व कठोरा रोड परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईविरोधात नगरसेवक चंद्रकांत (चंदूभाऊ) खेडकर यांच्या नेतृत्वात नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. महिलांचा मोठा सहभाग असलेल्या या आंदोलनात प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.नागरिकांनी वारंवार निवेदने देऊनही पाणीपुरवठा सुरळीत करण्यात अपयश आल्याचा आरोप करत, वाल्व वेळेवर उघडले जात नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले.यावेळी नगरसेवक चंदू खेडकर यांनी उपकार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरत, “तातडीने पाणी समस्या सोडवा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा दिला. अर्चना सोनवाल, सिंधुताई डाहाके, मिनल सोनवाल यांच्यासह अनेक महिलांनी निवेदनाद्वारे नियमित व पुरेशा पाणीपुरवठ्याची मागणी केली. आंदोलनानंतर मजीप्रा प्रशासनाने पाणीपुरवठा प्रणाली तातडीने दुरुस्त करून समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी