
जिल्हा मराठी भाषा समितीला अहवाल सादर करण्याचा आदेश
बीड, 25 मे (हिं.स.)।
अंबाजोगाई शहराला
'पुस्तकांचे गाव' म्हणून घोषित करण्याच्या प्रक्रियेला आता प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे. राज्य मराठी विकास संस्थेने या संदर्भात बीडचे अपर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून यापुढील आवश्यक ती कायदेशीर व तांत्रिक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
या योजनेच्या पार्श्वभूमीवर, केज मतदारसंघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी अंबाजोगाई शहराला पुस्तकांचे गाव म्हणून मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावानुसार राज्य मराठी विकास संस्थेने अंबाजोगाई शहराची भौगोलिक माहिती आणि या उपक्रमात स्वेच्छेने सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या ग्रामस्थांची माहिती मागवली होती. याला सकारात्मक प्रतिसाद देत अपर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंबाजोगाई शहराचा सविस्तर नकाशा, सविस्तर माहिती आणि स्थानिक नागरिकांचे अर्ज राज्य मराठी विकास संस्थेला सादर करण्यात आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई शहरातील एकूण ५ संस्था आणि ६ खाजगी व्यक्तींनी या योजनेत सक्रिय सहभागी होण्यासाठी अधिकृत अर्ज केले आहेत.
राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही गावाची पुस्तकांचे गाव म्हणून निवड करण्यापूर्वी त्या गावाची प्रत्यक्ष पाहणी करणे बंधनकारक आहे. याच नियमाच्या आधारे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर अंबाजोगाई शहराची प्रत्यक्ष पाहणी पूर्ण करावी आणि त्याबाबतचा सविस्तर अहवाल लवकरात लवकर राज्य मराठी विकास संस्थेकडे पाठवावा, असे आदेश पत्राद्वारे देण्यात आले आहेत. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंबाजोगाईला 'पुस्तकांचे गाव' म्हणून अधिकृत घोषित करण्याबाबत पुढील अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis