'गोकूळ'च्या निवडणूकीसाठी सभासद संस्था प्रतिनिधीचे ठराव देण्याची प्रक्रिया सुरु
कोल्हापूर, 25 मे (हिं.स.)। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ( गोकुळ)च्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी सभासद दूध संस्थांना आपल्या प्रतिनिधींच्या नावाचे ठराव सहायक निबंधक (दुग्ध) विभागाकडे १ जुलैपर्यत सादर करता येणार आहेत. याबाबतचा आदेश राजकुमार पा
गोकुळ दुध संघ


कोल्हापूर, 25 मे (हिं.स.)। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ( गोकुळ)च्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी सभासद दूध संस्थांना आपल्या प्रतिनिधींच्या नावाचे ठराव सहायक निबंधक (दुग्ध) विभागाकडे १ जुलैपर्यत सादर करता येणार आहेत. याबाबतचा आदेश राजकुमार पाटील जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), पुणे विभाग, यांनी आज जारी केला. यानुसार संबधित दूध संस्थाना पत्र पाठवण्याची मुदत 26 मे ते 1 जून 2026 पर्यंत असून 2 जून पासून 1 जुलै 2026 पर्यंत प्रतिनिधींच्या नावाचे ठराव दाखल करण्याची मुदत निश्चित झाली आहे. या निमित्ताने गोकूळ दूध संघाच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

सभासद दूध संस्थांना आपल्या प्रतिनिधींच्या नावाचे ठराव सहायक निबंधक (दुग्ध) कोल्हापूर विभागाकडे १ जुलैपर्यत सादर करता येणार आहेत.

'गोकुळ'ची निवडणूक मतदार यादीवरील हरकतीवरुन न्यायालयीन प्रक्रियेत अडकली होती. संघाने सादर केलेल्या यादीतील १३२० दूध संस्थांना अवसायनाचे मध्यंतरी आदेश काढले होते. त्या संस्थांची सुनावणीची प्रक्रिया सुरु असताना संचालक मंडळाची मुदत संपल्याने 'गोकुळ'वर पाच सदस्यीय प्रशासकीय मंडळ आले आहे.

निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठी एक गट प्रयत्नशील असताना 'गोकुळ'ची निवडणूक ९० दिवसात घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याचे सांगत प्रक्रिया तातडीने सुरु करण्याची मागणी माजी संचालकांनी केली होती. त्यामुळे गेली पंधरा दिवस शासनाच्या पातळीवर निवडणूकीबाबत हालचाली सुरु होत्या. गोकूळ दूध संघात सत्तारूढ आघाडीचे नेतृत्व करणारे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना 'गोकुळ'च्या निवडणूक प्रक्रियेत घेरण्याची रणनिती महायुतीतील भाजपच्या गटाने सुरु केली होती.

त्यांचे सुपुत्र नविद मुश्रीफ हे चेअरमन होते. प्रशासक मंडळ आल्याने त्यांच्यासह संचालक मंडळाला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. त्यांनी न्यायालयासह शासन पातळीवर पाठपुरावा करुन निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात यश मिळवले.

सभासद दूध संस्थांना ठराव मागणी पत्रे पाठवणे : २६ मे ते १ जून २०२६ प्रतिनिधी नियुक्तीचा ठराव सहायक निबंधक कार्यालयाकडे पाठवणे : २ जून ते १ जुलै या प्रमाणे कार्यक्रम निश्चित केला आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या, कोल्हापूर (गोकुळ) या अ वर्गातील संघाच्या पंचवार्षिक निवडणूक सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी प्रारूप मतदार यादी तयार करणेकरीता, तिच्या सभासद सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव मागविणे, एकत्रिकरण करून प्रारूप मतदार यादी तयार करणेसाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) कोल्हापूर यानां प्रारूप मतदार यादी तयार करणेकरीता, दिलेल्या आदेशात सभासद सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव मागविणे, एकत्रिकरण करून प्रारूप मतदार यादी तयार करणेकरीता कालबध्द प्रशासकीय कार्यक्रम तयार करुन सादर केलेला आहे. सदर कार्यक्रमामध्ये सुधारणा करुन सुधारीत कालबध्द प्रशासकीय कार्यक्रम निश्चित केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande