
अमरावती, 25 मे (हिं.स.)।
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नांदगावपेठ येथील साडेआठशे वर्षे पूर्व प्राचीन व पवित्र श्री गोविंदप्रभू तीर्थस्थानाचा विकास आराखडा तयार करण्यात यावा आणि या तीर्थक्षेत्राला राज्यस्तरीय दर्जा मिळावा, अशी मागणी भाविक भक्त व ग्रामस्थांच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानातील गुरुद्वारा करतारपूर कॉरिडॉर उभारणीसाठी पुढाकार घेतला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी मुंबई येथील इंदू मिलची जागा उपलब्ध करून दिली. त्याच धर्तीवर नांदगावपेठ येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गोविंदप्रभू तीर्थस्थानाचा विकास आराखडा तयार करून या पवित्र स्थळाचा विकास करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नांदगावपेठ येथील हे तीर्थस्थान महानुभाव संप्रदायाचे जनक श्री चक्रधरस्वामी यांचे गुरू श्री गोविंदप्रभू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले असून, हे ठिकाण आजही उपेक्षित असल्याची खंत भाविकांनी व्यक्त केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून ट्रस्टच्या माध्यमातून या तीर्थस्थानाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू असून, याठिकाणी भव्य-दिव्य मंदिर उभारण्यात यावे तसेच जिल्ह्यातील हे महत्त्वाचे तीर्थस्थान मुख्य प्रवाहात आणण्यात यावे, अशी मागणी विनयमुनी दर्यापूरकर, गोवर्धनमुनी दर्यापूरकर, उद्धवमुनी दर्यापूरकर यांच्यासह महानुभाव वारकरी मंडळी, स्थानिक ग्रामस्थ, परिसरातील भक्तगण तसेच सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
देशभरातून भाविकांची वर्दळ
महानुभव पंथीयांसाठी नांदगावपेठ तीर्थक्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचे असून देशभरातून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाला येथे दैनंदिन दाखल होत असतात. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांसाठी सभामंडप उभारण्यात आला असून मंदिराच्या उद्धारासाठी भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नांदगावपेठ येथील श्री गोविंदप्रभू तीर्थस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी