
जळगाव, 25 मे (हिं.स.)जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोदामांमध्ये काम करणाऱ्या हमाल कामगारांचा रोजगार धोक्यात आला असून, आपल्या मागण्यांसाठी ‘जळगाव जिल्हा माथाडी व जनरल कामगार संघटना’ आता आरपारच्या लढाईसाठी मैदानात उतरली आहे. शासनाच्या नव्या निर्णयामुळे गोदामातील काम पूर्णपणे बंद होऊन ते वाहतूक ठेकेदारांना देण्याच्या हालचाली सुरू असल्याने शेकडो हमालांवर उपासमारीची वेळ आली आहे. याविरोधात आज, २५ मे ते उद्या २६ मे असे दोन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. मागणी मान्य न झाल्यास २७ मेपासून संपूर्ण जिल्ह्यात बेमुदत ‘काम बंद’ आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. शासकीय धान्य गोदामांमध्ये वर्षानुवर्षे हमालीचे काम करून कुटुंब चालवणाऱ्या हमाल कामगारांना डावलून हे काम वाहतूक ठेकेदारांना सोपवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे माथाडी मंडळाकडे रीतसर नोंदणीकृत असलेल्या हमालांचे काम हिरावले जात आहे. ठेकेदारांच्या मनमानीमुळे हमालांचे हक्क मारले जात असल्याचा आरोप कामगार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉर्मेड रवींद्र सपकाळे आणि जिल्हा सरचिटणीस शरद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले आहे. “जे हमाल कामगार माथाडी मंडळात नोंदणीकृत आहेत, त्यांनाच गोदामातील हमालीचे काम दिले पाहिजे. तसेच संबंधित ठेकेदारांनी हमालांची मजुरी आणि लेव्हीची रक्कम नियमानुसार माथाडी मंडळातच जमा करावी,” अशी ठाम मागणी संघटनेने लावून धरली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर