
बीड, 25 मे (हिं.स.)।
बीड परिसरामध्ये निर्माण झालेले ढगाळ वातावरण अखेर बरसले. बीड तालुक्यातील चौसाळा, रौळसगाव, वानगाव आणि परिसरातील गावांमध्ये विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. याच दरम्यान महावितरणचा वीज पुरवठा खंडीत झाला. गुल झालेला वीज पुरवठा सुरु झालेला नव्हता. यामुळे महावितरणविषयी संताप व्यक्त झाला.
ऐन उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह चौसाळा आणि परिसरातील अनेक गावांत जोरदार पाऊस सुरु असताना या जोरदार पावसामुळे वीज पुरवठा खंडीत झाला. अचानक आलेल्या या संकटामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे कोलमडले असून, रस्त्यांवर पाणीच पाणी साचले होते.
आधीच ढगाळ वातावरण असल्याने अंधारून आले होते, त्यातच अचानक सुटलेल्या वेगवान र्वायाने धुमाकूळ घातला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, चौसाळा व परिसरातील बाजारपेठेत रस्त्याकडेला बसर्णाया छोट्या विक्रेत्यांची मोठी धांदल उडाली. अनेक विक्रेत्यांचे
दुकानाचे साहित्य, ताडपत्री आणि शेड हवेत उडून गेले. अचानक आलेल्या या संकटामुळे आपले सामान वाचवण्यासाठी दुकानदारांची एकच पळापळ झाली. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनाही सुरक्षित निवारा शोधण्यासाठी धावपळ करावी लागली. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढल्याने नागरिक उन्हाच्या झळा आणि उकाड्याने हैराण झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis