
अमरावती, 25 मे (हिं.स.)
अमरावती येथील पुरातन अंबादेवी मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम करण्याकरिता संस्थेच्या विश्वस्तांनी अकोली रिंग रोडलगतची ३.५२ हेक्टर शेती विकण्याची निविदा काढली होती. शहरातील काही बिल्डरांनी निविदा भरली आणि शेत विक्रीचा लिलाव होण्यापूर्वीच अंबादेवीचे भक्त शेखर पुरूषोत्तम कान्नव आणि रामकिशोर नंदलाल अग्रवाल यांनी आक्षेप घेतल्यामुळे धर्मदाय सहआयुक्त दीपक खोचे यांनी शेत विक्रीला स्थगिती दिली. त्यामुळे बिल्डर लॉबीत चांगलीच खळबळ उडाली आहे.
अमरावती शहरातील अंबादेवीचे सुमारे ५०० वर्षांपासूनचे पुरातन मंदिर आहे. राज्यासह अन्य राज्यातील भाविक येथे अंबादेवीच्या दर्शनाला येतात. नवरात्रीला ९ दिवस मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी यात्रा भरते. पुरातन मंदिर असल्यामुळे मंदिराचा गाभारा जिर्ण झाला आहे. तसेच संस्थेच्या विश्वस्तांनी एक हॉस्पिटल बांधण्याचा निर्णयसुध्दा घेतला आहे. याकामाकरिता कोट्यवधी रुपयांचा खर्च होणार असल्यामुळे संस्थेच्या विश्वस्तांनी अकोली रिंग रोड लगतची ३.५२ हेक्टर शेती विकण्याचा निर्णय घेतला. २९ नोव्हेंबर २०२५ ला वृत्तपत्रात जाहिरात देऊन निविदा काढली होती. तेव्हा शहरातील बिल्डर वरुण मालू यांनी प्रती एकर १.३३ कोटी, आडवाणी यांनी १.३१ कोटी आणि अनिश मेहता यांनी प्रती एकर १.३५ कोटी रुपयांची निविदा दाखल केली होती. त्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी अनिश मेहता यांची प्रती एकर १ कोटी ३५ लाख रुपये ही आधारभुत किंमत समजून ५ मे २०२६ रोजी खुल्या न्यायालयात बोली बोलाविण्याची जाहिरात दिली. त्यानंतर १५ मे २०२६ रोजी खुल्या न्यायालयात सुरु असलेल्या बोलीमध्ये शहरातील चार बिल्डरांनी उडी घेतली. यामध्ये आर.आर. अग्रवाल, प्रणय अनिल अग्रवाल, सुनील सिताराम भुत आणि संदेश अनुपमजी झंवर यांचा समावेश होता. परंतु १२ मे रोजी रामकिशोर अग्रवाल आणि १५ मे ला शेखर कान्नव या दोन्ही भक्तानी शेत विक्रीवर आक्षेप घेतला. आक्षेपात त्यांनी नमुद केले की, संस्थेवर २०१७ पासून तत्कालीन सहधर्मदाय आयुक्त अमरावती यानी सुमोटो कारवाई करुन संस्थानमध्ये सुरु असलेले कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला आणि कलम ४१ (ब) अंतर्गत प्रकरण स्वयंखुद्द दाखल केले होते. हे प्रकरण प्रलंबित असताना संस्थेला जंगम मालमत्ता विकता येत नाही. महाराष्ट्र शासनसोबत संस्थानचे विश्वस्त फसवणूक करत आहेत. अमरावती जिल्हाधिकारीद्वारा अकोली रिंग रोड लगरच्या संस्थेच्या ३.५२ हेक्टर पैकी ०.९१ आर हेक्टर शेती अकोली रिंग रोडकरीता २०२५ मध्ये संपादित केली आहे. तरीसुध्दा संस्थान पूर्ण ३.५२ हेक्टर शेती विक्रीच्या बेतात आहे. शेती विक्रीकरिता कलम ३६ (१) (अ) अंतर्गत केलेल्या अर्जात संस्थेने जीणर्णोद्धार व हॉस्पिटल बांधकामाकरिता ४१ कोटी रूपये रक्कम आवश्यक असल्याचे नमुद केले आहे. परंतु सदर शेती विकून संस्थेला मात्र १० कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे उर्वरित ३१ कोटी रुपये संस्था कुठून गोळा करणार असा प्रश्न अनुत्तरित आहे.
यावरुन संस्थानची आणखी मालमत्ता भविष्यात विक्रीला काढण्याची शक्यता आहे. संस्थेने अगोदर जीर्णोद्धारा व हॉस्पिटल बांधकामाकरिता भाविकभक्तांकडून देणगी गोळा करणे आवश्यक होते, असा आक्षेप रमकिशोर अग्रवाल आणि शेखर कान्नव यांनी घेतला आहे. त्यामुळे धर्मादाय सहआयुक्त दीपक खोचे यांनी शेती विक्रीच्या निविदेवर स्थगिती दिली आहे. त्यामुळे शहरातील बिल्डर लॉबीत चांगलीच खळबळ उडाली आहे.
बिल्डर लॉबीच्या दबावात शेत विक्री
अंबादेवी संस्थानच्या विश्वस्तांनी 66 मागील १० वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. संस्थेत प्रचंड प्रमाणात गैरप्रकार सुरू आहे. तसेच बिल्डर लॉबीच्या दबावात कोट्यवधी रुपयांचे शेत कवडीमोल भावात विकण्याचे षडयंत्र संस्थेचे विश्वस्त करीत आहेत.
रामकिशोर अग्रवाल, अंबादेवी भक्त.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी