
पुणे, 30 मे (हिं.स.) : फुगेवाडी येथे विषारी दारू प्राशनामुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनेनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवैध दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात व्यापक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत चाकण, महाळुंगे आणि शिरगाव परिसरातील अवैध दारू भट्ट्यांवर एका दिवसात पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 9 लाख 25 हजार रुपये किमतीचे दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे कच्चे रसायन नष्ट केले.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत असलेल्या एका खड्ड्यात शुक्रवारी रात्री हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी अंदाजे 1 लाख 40 हजार रुपये किमतीचे रसायन भिजत ठेवण्यात आल्याचे पोलिसांना आढळून आले. मात्र, पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच संबंधित महिला आरोपी घटनास्थळावरून फरार झाली. या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
दरम्यान, निघोजे येथील डोंगराळ भागात विनापरवाना हातभट्टीची दारू साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईत नितीन धोंडीबा गायकवाड (वय 53) याच्याकडून सुमारे 10 हजार रुपये किमतीची हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.
फुगेवाडीतील विषारी दारू दुर्घटनेनंतर पोलिसांनी अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली आहे. अशा बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
अवैध दारू निर्मितीमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होत असल्याने अशा प्रकारांविरोधात जनतेनेही सतर्क राहून पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु