

रायगड, 30 मे (हिं.स.)। परभणीकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत चार तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (२९ मे) रात्री साडेनऊच्या सुमारास राहुल जिनिंगसमोर घडली. या अपघातामुळे मानवत शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत्यूमुखी पडलेले सर्वजण मानवत येथील रहिवासी असून शुभम आप्पाराव दहे (वय ३०), विष्णू गोरे (वय २८), प्रल्हाद अशोकराव कुटे (वय २९) आणि नवनाथ शामराव जाधव (वय ३८) अशी त्यांची नावे आहेत. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, मृतांपैकी एकाची ओळख सुरुवातीला पटवणेही कठीण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘एनएल ०१ बी १३७४’ क्रमांकाची ट्रॅव्हल्स परभणीहून पुण्याकडे जात होती. दरम्यान, राहुल जिनिंगसमोर समोरून येणाऱ्या ‘एमएच २२ बीबी ४७२४’ क्रमांकाच्या दुचाकीला ट्रॅव्हल्सची समोरासमोर जोरदार धडक बसली. धडकेनंतर दुचाकीचा चक्काचूर झाला.
अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगे, प्रमोद देवकते आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह आणि जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलवले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करून वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मानवत ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत नातेवाईक आणि नागरिकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. एकाच गावातील चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)