पुणे - चार हजार लिटर गावठी दारूसह मोठा मुद्देमाल जप्त; तपासाला वेग
पुणे, 31 मे (हिं.स.)। पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या विषारी दारू प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आला असून, या गंभीर प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी सीआयडीने पाच विशेष पथके स्थापन केली आहेत. विषारी दारू सेव
पुणे - चार हजार लिटर गावठी दारूसह मोठा मुद्देमाल जप्त; तपासाला वेग


पुणे, 31 मे (हिं.स.)। पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या विषारी दारू प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आला असून, या गंभीर प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी सीआयडीने पाच विशेष पथके स्थापन केली आहेत.

विषारी दारू सेवन केल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. या घटनेनंतर उत्पादन शुल्क विभाग, पुणे पोलीस आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू केला होता. तपासादरम्यान विविध ठिकाणी छापेमारी करून सुमारे चार हजार लिटर गावठी दारू तसेच मोठ्या प्रमाणात संबंधित साहित्य जप्त करण्यात आले.

या प्रकरणात मुख्य सूत्रधार योगेश वानखेडे याच्यासह आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने शुक्रवारी (29 मे) उशिरा रात्री हा तपास सीआयडीकडे वर्ग केला.

सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासासाठी पाच स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून तपासाची जबाबदारी एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांकडून आवश्यक माहिती आणि कागदपत्रे संकलित करण्यात येत आहेत.

विषारी दारूची निर्मिती, पुरवठा साखळी, वितरण व्यवस्था तसेच या प्रकरणामागील संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी सीआयडीकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande