
मुंबई, 31 मे (हिं.स.)।
भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईतर्फे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाचे विशेष आयोजन मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम जी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री दीपक सिंह जी यांच्या नेतृत्वात मुंबईभर २०० हून अधिक ठिकाणी करण्यात आले.
या विशेष अभियानामध्ये प्रथमच मतदान करणाऱ्या युवा मतदारांना (फर्स्ट टाइम वोटर्स) जोडण्यावर विशेष भर देण्यात आला. मुंबईतील सर्व विधानसभा क्षेत्रे व मंडळांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी झाले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे विचार ऐकत राष्ट्रनिर्माणातील आपल्या भूमिकेबाबत सकारात्मक संवाद साधला.
कार्यक्रमादरम्यान विकसित भारत, आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप्स, नवोन्मेष, पर्यावरण संवर्धन, सामाजिक उत्तरदायित्व, लोकशाहीतील सहभाग आणि युवा शक्तीचे महत्त्व अशा विविध विषयांवर पंतप्रधानांनी व्यक्त केलेले विचार उपस्थितांनी गांभीर्याने ऐकले. तसेच देशाच्या विकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्पही अनेक युवकांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजयुमो मुंबईचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, मंडळ पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
यावेळी भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री दीपक सिंह जी म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे ‘मन की बात’ हे केवळ रेडिओवरील कार्यक्रम नसून देशातील कोट्यवधी नागरिकांना, विशेषतः युवकांना राष्ट्रनिर्माणाशी जोडणारे एक लोकचळवळीत रूपांतरित झाले आहे.”
ते पुढे म्हणाले, “यंदा भाजयुमो मुंबईने विशेषतः आगामी निवडणुकांमध्ये प्रथमच मतदान करणाऱ्या युवकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. भारताचे भविष्य केवळ मतदानावर अवलंबून नसून जागरूक मतदान, सामाजिक सहभाग आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या विचारांवर अधिक मजबूत होणार आहे.”
तसेच, “मुंबईतील २०० हून अधिक ठिकाणी झालेल्या या व्यापक अभियानातून हे स्पष्ट झाले आहे की देशातील युवा वर्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वावर, त्यांच्या दूरदृष्टीवर आणि विकसित भारताच्या संकल्पनेवर विश्वास ठेवतो. आजचा युवा केवळ प्रेक्षक नसून परिवर्तनाचा सक्रिय भागीदार बनू इच्छितो.”
भाजयुमो मुंबई आगामी काळातही अशाच विविध उपक्रमांच्या माध्यमातून युवकांना लोकशाही प्रक्रिया, राष्ट्रवादी विचार आणि सामाजिक उत्तरदायित्वाशी जोडण्याचे कार्य सातत्याने करत राहील. प्रथमच मतदान करणाऱ्या युवकांना जागरूक, जबाबदार आणि सक्रिय नागरिक बनविणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शेवटी त्यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कार्यक्रमात सहभागी झालेल्या युवकांचे आभार मानले. मुंबईतील प्रत्येक विभागातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा भाजप व भाजयुमोवरील युवांचा विश्वास आणि संघटनशक्तीचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर