
पुणे, 31 मे (हिं.स.)। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. त्यामुळे काही काळ खळबळ उडाली होती. गुवाहाटीकडे जाणाऱ्या प्रवासी विमानाच्या टॉयलेटमध्ये ‘बॉम्ब’ असा उल्लेख असलेली चिठ्ठी आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाली. या घटनेनंतर विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवून संपूर्ण विमानाची कसून तपासणी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीचे विमान सकाळी ७ वाजता पुण्याहून गुवाहाटीकडे रवाना होणार होते. सर्व प्रवासी विमानात बसलेले असताना सकाळी साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान एअर होस्टेसने नियमित तपासणीसाठी विमानातील टॉयलेटची पाहणी केली. त्यावेळी तिला एक संशयास्पद चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीवर ठळक अक्षरांत ‘बॉम्ब’ असे लिहिलेले होते.
घटनेची माहिती मिळताच एअर होस्टेसने तत्काळ पायलट आणि विमानतळ सुरक्षा यंत्रणेला याबाबत कळवले. सुरक्षा नियमांनुसार विमान धावपट्टीवरील एका निर्जन भागात हलवण्यात आले. त्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकासह विविध सुरक्षा यंत्रणांनी विमानाची आणि प्रवाशांच्या सामानाची सखोल तपासणी सुरू केली. विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आहे का, याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण विमानाची बारकाईने पाहणी करण्यात आली.
या घटनेमुळे काही काळ विमानतळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुरक्षा यंत्रणांनी तातडीने आणि दक्षतेने कारवाई केल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली. पुढील तपास सुरू असून चिठ्ठी कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवली याचा शोध घेतला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु