रत्नागिरीत ‘सुपरहिरो ऑन व्हील्स’ सायक्लोथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी, 04 मे (हिं.स.) । रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या वतीने ‘किड्स सायक्लोथॉन’ अत्यंत उत्साहात पार पडली. ‘सुपरहिरो ऑन सायकल’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाला शहरातील बालदोस्तांनी उदंड प्रतिसाद दिला. पाचशेहून अधिक मुलांनी यात सहभाग नोंदवला. महि
Superhero on Wheels


रत्नागिरी, 04 मे (हिं.स.) । रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या वतीने ‘किड्स सायक्लोथॉन’ अत्यंत उत्साहात पार पडली. ‘सुपरहिरो ऑन सायकल’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाला शहरातील बालदोस्तांनी उदंड प्रतिसाद दिला. पाचशेहून अधिक मुलांनी यात सहभाग नोंदवला.

महिला व बाल विकास विभागाच्या सहकार्याने आयोजित या सायकल फेरीच्या माध्यमातून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्यात आला.

रत्नागिरीतील तारांगण येथून या सायक्लोथॉनला दिमाखात प्रारंभ झाला. उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर, हिरो सायकल्सचे एरिया मॅनेजर प्रेम सागर, ज्येष्ठ नगरसेविका स्मितल पावसकर, पूजा पवार, विनोद शाह, वीरेंद्र वणजू या मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून सायकलस्वारांना रवाना केले.

या स्पर्धेत १० आणि ५ किलोमीटर असे दोन गट ठेवण्यात आले होते. ५ किलोमीटरच्या गटाने माळनाका आणि थिबा पॅलेस मार्गे नाचणे पॉवरहाऊस येथील गजानन महाराज मंदिराला वळसा घालून आपली फेरी पूर्ण केली, तर १० किलोमीटरच्या गटाने शांतीनगरपर्यंतचा टप्पा गाठून पुन्हा तारांगण गाठले.

जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या पुढाकाराने सर्व सहभागी मुले आणि उपस्थित पालकांनी ‘बेटी बचाओ’ची सामूहिक शपथ घेतली. पोदार स्कूलच्या म्युझिकल बँडने सादर केलेल्या पथकाने वातावरण अधिकच उत्साहवर्धक केले होते. सहभागी प्रत्येक मुलाला आकर्षक पदक, प्रमाणपत्र आणि अल्पोपाहार देण्यात आला, ज्यामुळे मुलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मुलांच्या सुरक्षेसाठी हेल्मेटची सक्ती करण्यात आली होती, तसेच वाहतूक पोलीस, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका तैनात असल्याने संपूर्ण नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.

सायक्लोथॉनच्या यशासाठी हिरो सायकल्स, हिंद सायकल ट्रेडिंग कंपनी, सुरस स्नॅक्स, पलाश ब्लूम, सुवर्णसूर्य फाउंडेशन, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, पायल किड्स, क्रेडाई रत्नागिरी, फ्लेवर्स बेकरी, रुचकर कोकण आणि सी फॅन्स हॉटेल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पालकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करताना सांगितले की, सायक्लोथॉनपूर्वी घेतलेल्या सराव फेऱ्यांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढला होता आणि नियोजनाचा दर्जा अत्यंत उच्च होता. फिटनेसची ओढ निर्माण करण्यासोबतच मुलांमध्ये एक वेगळाच जल्लोष निर्माण झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande