

रायगड, 05 मे (हिं.स.)।मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील एमएमआरडीए मैदानावर 2 ते 14 मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या “महालक्ष्मी सरस 2026” प्रदर्शनात रायगड जिल्ह्यातील तब्बल 28 महिला बचतगटांनी सहभाग नोंदविला आहे. ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या वस्तूंना विक्रीचे व्यापक व्यासपीठ मिळावे, यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी “महालक्ष्मी सरस” प्रदर्शनाची तुलना जागतिक दर्जाच्या प्रदर्शनांशी होऊ शकते, असे सांगितले.
रायगड जिल्ह्यातील 28 बचतगटांपैकी 24 गटांनी विविध हस्तकला, गृहउपयोगी वस्तू, कपडे, पारंपरिक उत्पादने विक्रीसाठी ठेवली आहेत. तर 4 बचतगटांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले आहेत. या स्टॉलवरील विविध पदार्थ आणि उत्पादनांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यामुळे महिला बचतगटांना आर्थिक बळ मिळत आहे.
या प्रदर्शनासाठी रायगड जिल्ह्याच्या महिला समन्वयक म्हणून निशा आवस्कर तर जिल्हा समन्वयक म्हणून सौरभ देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 14 मेपर्यंत सुरू असलेल्या या प्रदर्शनास सर्व नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)