
रायगड, 05 मे (हिं.स.)।म्हसळा नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पक्षांतर केलेल्या सात नगरसेवकांच्या अनर्हता प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या मुद्द्यावरून स्थानिक राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या अनर्हतेच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली असली तरी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर पुन्हा कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा खासदार सुनील तटकरे यांनी दिला आहे.
म्हसळा येथे पत्रकारांशी संवाद साधताना खासदार तटकरे म्हणाले की, अनर्हता ठरलेले नगरसेवक सध्या शिवसेनेत गेले असले तरी अधिकृतरीत्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान करणे त्यांच्यावर बंधनकारक राहील. पक्षाचा व्हीप बजावण्यात आला असून त्याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी पक्षांतर केलेल्या नगरसेवकांवर टीका करत, “म्हसळा शहराचा विकास सुरू असताना ज्यांनी आम्हाला फसवले, त्यांनी निदान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तरी फसवू नये,” असा टोला लगावला. काही नगरसेवकांनी पुन्हा पक्षात घेण्याची विनंती केली होती, मात्र ती फेटाळण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, ७ मे रोजी होणाऱ्या नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हसळा नगरपंचायतीतील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)