
डोंबिवली, 05 मे (हिं.स.) : डोंबिवली पूर्वेकडील टंडन रोड परिसरात रस्ता रुंदीकरणासाठी सुरू करण्यात आलेली कारवाई आज तात्पुरती स्थगित करण्यात आली. साखरी गणेश सोसायटी ते पारकर सदन या दरम्यान असलेले नऊ गाळे आणि पाच घरे रस्ता रुंदीकरणात बाधित होत असल्याने महापालिका प्रशासनाने मार्च महिन्यात संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या.
या नोटिशीमध्ये 7 दिवसांच्या आत बांधकामाखालील जमीन रस्त्यासाठी महापालिकेकडे सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार ५ मे रोजी दुपारच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात पालिका प्रशासन जेसीबीच्या सहाय्याने कारवाईसाठी घटनास्थळी दाखल झाले.
कारवाई सुरू होताच कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार राजेश मोरे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करताना स्पष्ट भूमिका मांडली की, “विकासाला आमचा विरोध नाही, मात्र गरीब नागरिकांचे पुनर्वसन केल्याशिवाय त्यांच्या घरांवर कारवाई करू नये. शिवसेना कोणालाही बेघर होऊ देणार नाही.”
आमदार मोरे यांच्या ठाम भूमिकेनंतर पालिका प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत कारवाई तात्पुरती स्थगित केली. यावेळी सहायक आयुक्त बाळासाहेब चव्हाण, प्रसाद ठाकूर, राजेश सावंत तसेच पालिकेचे कर्मचारी आणि पोलीस उपस्थित होते.
घटनास्थळी बाधित रहिवासी आणि गाळेधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चेनंतर प्रशासनाने आमदारांच्या विनंतीला मान देत पुढील आदेश येईपर्यंत कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, शिवसेनेने आपली घरे वाचवल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आमदार राजेश मोरे यांचे आभार मानले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi