
सोलापूर, 06 मे (हिं.स.)। खासदार असूनही वर्षातून दर तीन महिन्यांनी सोलापूरला येणाऱ्या आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी पात्रता नसतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलून टीआरपी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या खा. प्रणिती शिंदे यांच्या बुद्धीची कीव येते अशी जोरदार राजकीय चपराक आमदार देवेंद्र कोठे यांनी खा. प्रणिती शिंदे यांना लगावली.
नसरापूर येथील प्रकरणाबाबत खा. प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आमदार देवेंद्र कोठे यांना प्रतिक्रिया विचारली असता आ. देवेंद्र कोठे यांनी खा. प्रणिती शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.
आ. देवेंद्र कोठे म्हणाले, नसरापूर येथील चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर आरोपींना कायद्याच्या चौकटीत राहून त्वरित शिक्षा मिळवून दिल्याची कित्येक उदाहरणे आहेत. असे असताना खा. प्रणिती शिंदे मात्र प्रसिद्धीसाठी धडपड करत आहेत. प्रसारमाध्यमांचे कॅमेरे, बूम दिसल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळविल्याशिवाय रहावत नाही, असेही आ. देवेंद्र कोठे म्हणाले.
सुशीलकुमार शिंदे देखील अनेक वर्षे केंद्रीय गृहमंत्री होते. त्या काळातही अनेक अनिष्ट घटना देशभरात घडल्या. त्यावेळी आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांनी आपल्या वडिलांना किंवा संबंधित नेतृत्वाला राजीनामा मागितला का ? असा सवालही आ. कोठे यांनी उपस्थित केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड