
धाराशिव, 06 मे (हिं.स.)।
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन २०२५-२६ करिता त्रुटीपुर्तता करणेची व हार्डकॉपी जमा करण्याची अखेरची मुदत ८ मे २०२६ पर्यंत असल्याची महत्त्वाची सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात आली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तसेच शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील इयत्ता ११ वी,१२ वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे यासाठी भोजन भत्ता,निवास भत्ता व निर्वाह भत्ता तसेच इतर शैक्षणिक सुविधा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार या योजनेमधून उपलब्ध करून देण्यात येतात.वसतिगृह प्रवेश व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत.त्यानुषंगाने सन २०२५-२६ करिता स्वाधार योजनेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणी करण्यात आलेली असून एकूण १७६५ प्राप्त अर्जांपैकी २२ विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये आहेत,तर ५० विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत हार्डकॉपी (ऑनलाईन प्रणालीवर भरलेल्या अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे) समाज कल्याण कार्यालयात जमा केलेली नाही.या बाबतीत संबंधित विद्यार्थ्यांना वेळोवेळी भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात आलेले असूनही अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांनी त्रुटीपुर्तता व आवश्यक कागदपत्रे कार्यालयात जमा केलेली नाहीत.
तरी ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत त्रुटीपूर्तता केलेली नाही व अर्जाची हार्डकॉपी (अर्ज व आवश्यक कागदपत्रे यांचा संच) समाज कल्याण कार्यालयात जमा केलेली नाही,अशा विद्यार्थ्यांनी अंतिम मुदत दिनांक ८ मे २०२६ पूर्वी त्रुटीपूर्तता करून आवश्यक कागदपत्रे समाज कल्याण कार्यालय,धाराशिव येथे जमा करावीत.यानंतर मुदतवाढ मिळणार नाही,याची नोंद घ्यावी.विहीत मुदतीत त्रुटीपूर्तता व आवश्यक कागदपत्रे कार्यालयास जमा न केल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल,याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी,असे आवाहन श्री सचिन कवले,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,धाराशिव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis