धाराशिवमध्ये इंधन टंचाईचा गैरसमज; पुरवठा सुरळीत
छत्रपती संभाजीनगर, 06 मे, (हिं.स.)। सद्यस्थितीत काही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर देशात इंधन टंचाई निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे.त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांनी अतिरिक्त स
धाराशिवमध्ये इंधन टंचाईचा गैरसमज; पुरवठा सुरळीत


छत्रपती संभाजीनगर, 06 मे, (हिं.स.)। सद्यस्थितीत काही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर देशात इंधन टंचाई निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे.त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांनी अतिरिक्त साठा करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.मात्र, जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याची माहिती प्रशासनाने स्पष्ट केली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तेल कंपन्यांच्या (एच.पी.सी.एल., बी.पी.सी.एल.,आय.ओ.सी.एल.) विक्री प्रतिनिधींसमवेत बैठक घेण्यात आली.या बैठकीत संबंधित कंपन्यांचे डेपो पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.तसेच,पंपधारकांच्या मागणीनुसार आवश्यकतेनुसार पेट्रोल व डिझेलचा पुरवठा तात्काळ करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.

दरम्यान, एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात पेट्रोल व डिझेल विक्रीत वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. यामागे नागरिकांनी अफवांच्या पार्श्वभूमीवर केलेली अतिरिक्त खरेदी कारणीभूत असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.त्यामुळे सर्व पेट्रोल पंप चालकांनी इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिल्या आहेत.

तसेच,जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील पेट्रोल पंपांची सखोल तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान कोणताही दोष आढळल्यास संबंधित पंप चालकांवर पेट्रोलियम अधिनियम २००२ तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसून सर्व पंपांवर नियमित पुरवठा सुरू आहे.त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.अधिकृत माहितीसाठी नागरिकांनी थेट जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande