
नांदेड, 06 मे (हिं.स.)। भगवंताची भक्ती कोणत्याही अपेक्षेने करावी भगवान कोणत्या रूपात आपल्याला सहकार्य करेल की आपल्याला कळणार पण नाही म्हणून भगवंताचे स्मरण गरजेचे आहे, असे प्रतिपादन हभप दिनेश महाराज कुलकर्णी केरुरकर यांनी केले.
श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळया निमित्त कीर्तनात दिनेश महाराजांनी भगवंत व भक्ती याविषयी सुंदर विवेचन केले. हभप दिनेश महाराज म्हणाले की, भगवंत हा भक्तांच्या भावाचा भुकेला आहे. भगवंतास काही देणे-घेणे अपेक्षित नाही. भक्त आपल्याला काय देतोय हे तो पाहत नाही. आपली देवावरची भक्ती, भाव हा मजबुत, दृढ असला तर अशा भक्तांसाठी देव कुठल्याही सुख-दुःखात् धावून येतो. भक्त अनन्य भावाने परमेश्वराला शरण गेल्यास त्याचे कल्याण परमेश्वर नक्की करतोच. ती भक्ती वाया जात नाह. अनेक दाखले देत त्यांनी देवाची भक्ती समजावून सांगितली. ज्याप्रमाणे भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान विष्णूनी नृसिंह रुपात अवतार धारण करुन प्रल्हादाचे रक्षण केले व दैत्याचा संहार केला. प्रल्हादाचे अंगी विष्णूची भक्ती मनोभावे होती असेही कुलकर्णी यांनी सांगितले. संत दामाजी पंत यांच्या जीवन चरित्रावर त्यांनी प्रकाश टाकला. या कार्यक्रमास केरुरकर परिवार, ह.भ.प. यज्ञेश्वर महाराज दीक्षित, लक्ष्मण पत्तेवार, जीवन कवटीकवार, राजू मुक्कावार, संतोष जामकर, संजय मेडेवार उपस्थित होते. कीर्तनात साथ संगत हरिभाऊ उमाटे यांनी केली. रामदास बेतेवाड, विजय कुलकर्णी, मारोती मुद्देवाड यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis