
ठाणे, 07 मे (हिं.स.)। : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यातील स्व-गणना (Self-Enumeration) प्रकियेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आला. महापौर शर्मिला पिंपळोलकर व उपमहापौर कृष्णा पाटील यांनी स्वत: स्वगणना केली. यावेळी त्यांनी जनगणना ही महत्वाची असून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने क्यूआर कोडच्या माध्यमातून स्वगणना करुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जनगणनेबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारने मॅसकोट तयार केले असून प्रतिकात्मक स्त्री व पुरूष यांचे कटआऊट तयार करुन त्यांना विकास व प्रगती अशी नावे दिली आहे. घरोघरी जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करुन आपली अचूक माहिती द्यावी, ती माहिती गोपनीय ठेवली जाणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले
आपले सरकार राज्यातील प्रत्येक व्यक्तीचा विकास आणि कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. हे साध्य करण्यासाठी, विश्वसनीय आणि अचूक आकडेवारी हेच आपले सर्वात प्रभावी साधन आहे. आपणास माहीतच आहे की, जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील स्व-गणना (Self-Enumeration) दि १५ मे, २०२६ पर्यंत सक्रिय राहणार आहे, याबाबत ठाणे महापालिकेच्या मुख्यालय स्तरावर मदत कक्षाची निर्मिती करण्यात आली असल्याचे सहायक आयुक्त सचिन बोरसे यांनी नमूद केले. तसेच शहरात विविध ठिकाणी क्यू आर कोड लावण्यात आले असून क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर येणारी सर्व माहिती नागरिकांनी भरुन स्वगणना करावी व स्वगणना केल्यानंतर नागरिकांना प्राप्त होणारा क्रमांक हा जनगणनेसाठी घरी येणाऱ्या प्रगणकांना द्यावा असेही श्री. बोरसे यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर