राज्यात १८ जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे
- १८ जून ते २ जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढणार मुंबई, 15 जून (हिं.स.) - कोकणच्या वेशीवर येऊन थांबलेला पावसाची महाराष्ट्रातील नागरिक सध्या चातकासारखी वाट पाहत आहेत. यंदा ६ जून रोजी तळकोकणात मान्सून दाखल झाला. मात्र त्यानंतर मान्सूनचा वेग मंदावला. गे
पाऊस प्रतिक्षा


- १८ जून ते २ जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढणार

मुंबई, 15 जून (हिं.स.) - कोकणच्या वेशीवर येऊन थांबलेला पावसाची महाराष्ट्रातील नागरिक सध्या चातकासारखी वाट पाहत आहेत. यंदा ६ जून रोजी तळकोकणात मान्सून दाखल झाला. मात्र त्यानंतर मान्सूनचा वेग मंदावला. गेल्या ५ दिवसांपासून मान्सूनची पुढील वाटचाल पूर्णपणे ठप्प झाली आहे. सध्या मान्सूनची उत्तर सीमा कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथेच स्थिरावली आहे. दरम्यान हवामान अभ्यासकांच्या मते, उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांनी मान्सूनच्या प्रवाहावर ताबा मिळवला आहे. या हवामान बदलामुळे मान्सूनची गती मंदावली असून इतर भागांत केवळ वादळी पावसाची नोंद होत आहे. मात्र, पुढील ४ ते ५ दिवसांत ही स्थिती बदलणार असून १८ जूननंतर राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने (आयएमडी) जाहीर केलेल्या नवीन अंदाजानुसार, १८ जून ते २ जुलै या कालावधीत मान्सून राज्याच्या विविध भागांत जोरदार हजेरी लावेल. तसे झाल्यास नागरिकांना सध्या जाणवणाऱ्या तीव्र उकाड्यापासून मोठा दिलासा मिळेल.

दरम्यान, शनिवारी मान्सूनने देशातील इतर राज्यांमध्ये हैदराबाद, ओडिशाची किनारपट्टी, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या काही भागांमध्ये प्रगती केली आहे. महाराष्ट्रात मात्र त्याला पुढे सरकण्यासाठी आणखी २ ते ३ दिवस वाट पाहावी लागणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे कोकणात अडकलेला मान्सून पुढील काही दिवसांत मुंबईत दाखल होण्याची आशा आहे. पुढील 4-5 दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये, तसेच कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या उर्वरित भागांमध्ये, ओडिशा, झारखंड, बिहारच्या आणखी काही भागांत आणि दक्षिण छत्तीसगडच्या काही भागांत पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. पश्चिम किनारपट्टीवर (म्हणजे कोकण किनारपट्टी) मान्सूनचा प्रवाह अधिक तीव्र करण्यासाठी बंगालच्या उपसागरात मध्य आणि उत्तर भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. मात्र, २० जूनपर्यंत अशी कोणताही पट्टा निर्माण होण्याची शक्यता नाही आणि हा काळ आणखीही पुढे वाढू शकतो.

दरम्यान, अफगाणिस्तानकडून येणाऱ्या गरम व कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनची वाटचाल रोखली गेली आहे. या कोरड्या वाऱ्याचा प्रभाव कमी झाला की, मान्सूनच्या पुढील प्रवासाला सुरुवात होणार आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये मान्सून दाखल होण्यासाठी आता थेट २० जून उजाडण्याची शक्यता हवामान अभ्यासक अर्थेय शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. मान्सूनची प्रगती मंदावल्याने अनेक भागांत उष्णता आणि दमट वातावरणाचा त्रास वाढला आहे.

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नंदूरबार आणि जळगाव या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर आणि सातारा येथे उष्णतेचा यलो अलर्ट आहे. तर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज असून ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातही काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande