
सोलापूर, 24 जून (हिं.स.)।
मोहरम उत्सवानिमित्त शनिवार पेठेतील शहीद-ए-आझम पंजा, जिंदशाह मदार चौक येथील मानकरी इकबाल रंगरेज यांच्या तर्फे इमाम-ए-कासीम पंजा, तसेच शनिवार पेठेतील घोडेवाले यांची पारंपरिक नाले हैदर हुसेन बाशा सवारी यांची भव्य मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. श्रद्धा, परंपरा आणि धार्मिक वातावरणाने नटलेल्या या मिरवणुकांनी शहरातील मोहरम उत्सवाला विशेष रंगत आणली.
मिरवणुकीपूर्वी पंज्यांना आकर्षक फुलांच्या सेहऱ्याने सजविण्यात आले होते. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि धार्मिक घोषणांमध्ये या सवाऱ्या विजापूर वेस, माणिक चौक, दत्त चौक मार्गे आसार मैदान येथे दाखल झाल्या. शहरातील विविध भागांतून आलेल्या सवारींच्या भेटीमुळे आसार मैदान परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
शनिवार पेठेतील शहीद-ए-आझम पंज्याची मिरवणूक धावत काढण्याची परंपरा आजही जपली जात आहे. धावत्या पंज्याचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच मंगळवेढा येथून आणलेल्या घोड्यांच्या नृत्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाले हैदर सवारीने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या सवारीमध्ये रफिक बिजापुरे घोडेवाले यांना मानाचे स्थान आहे.
यंदाच्या मोहरम उत्सवात नाले हैदर हुसेन बाशा सवारी देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या सवारीचे घोडे नाचवणारे मानकरी समाधान भोसले आणि अण्णा बिनवडे (मूळ मंगळवेढा) यांनी परंपरेनुसार सहभाग नोंदवत सवारीची शान वाढविली. सवारीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
आसार मैदान येथे सर्व पंजे आणि सवारी एकत्र आल्यानंतर शकील मौलवी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी गूळ आणि चपातीपासून तयार करण्यात आलेल्या पारंपरिक मलिदा प्रसादाचे भाविकांना वाटप करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड