
पुणे, 24 जून (हिं.स.)। सामाजिक न्याय, शिक्षण, समता आणि बहुजन कल्याणाचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे व्यापक विचार समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. २५ व २६ जून २०२६ या कालावधीत चिंचवड येथील साई मंदिर उद्यान, संभाजीनगर तसेच महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारत आणि के.एस.बी. चौक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रबोधन पर्वाचा उद्घाटन शुभारंभ गुरूवार, दि. २५ जून रोजी सायंकाळी ७.०० वाजता संभाजीनगर, चिंचवड साई मंदिर उद्यान येथे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारा ‘फोक संस्कृती’ हा ५० हून अधिक कलाकारांचा बहुरंगी कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. दि. २६ जून रोजी सकाळी १०.३० वाजता पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १०.४५ वाजता के.एस.बी. चौक, निगडी भोसरी रोड येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु