
परभणी, 14 जुलै, (हिं.स.)। पाथरी येथील अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी सन २०१६ पासून शासकीय वसतिगृह सुरू असून, पात्र विद्यार्थिनींनी 25 जुलैपर्यंत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर वसतिगृहात १०० मुलींच्या निवासाची व्यवस्था असून, त्यापैकी ७० जागा अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख व पारशी मुलींसाठी आरक्षित आहेत. उर्वरित ३० जागा शासनाच्या प्रचलित आरक्षण धोरणानुसार बिगर अल्पसंख्याक मुलींकडून भरण्यात येणार आहेत. खुल्या व इतर प्रवर्गातील मुलींसाठी प्रति सत्र २,८५० रुपये निवासी शुल्क आकारण्यात येणार आहे.
वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या मुलींना नाश्ता व भोजनाचा खर्च स्वतः करावा लागणार आहे. तसेच शासन निर्णयानुसार आहार भत्ता योजनेअंतर्गत अल्पसंख्याक समाजातील पात्र मुलींना दरमहा ३,००० रुपये आहार भत्ता त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
वसतिगृह प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी अधीक्षक, अल्पसंख्याक मुलींचे शासकीय वसतिगृह, पाथरी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाथरी तथा सदस्य-सचिव, अल्पसंख्याक मुलींचे शासकीय वसतिगृह, पाथरी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis