अमरावती शहरात चौका-चौकांत हेल्मेटची विक्री
अमरावती, 28 जुलै (हिं.स.) अमरावतीत सध्या दिवाळीसारखे वातावरण तयार झाले आहे. चौका-चौकांत आणि रस्त्यांवर फुले व फटाक्यांची नव्हे तर हेल्मेटची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. भाजीपाल्याच्या व्यवसायासारखे सध्या हेल्मेटच्या व्यवसायाला सुगीचे दिवस आले
शहरात हेल्मेटचा महापूर


अमरावती, 28 जुलै (हिं.स.)

अमरावतीत सध्या दिवाळीसारखे वातावरण तयार झाले आहे. चौका-चौकांत आणि रस्त्यांवर फुले व फटाक्यांची नव्हे तर हेल्मेटची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. भाजीपाल्याच्या व्यवसायासारखे सध्या हेल्मेटच्या व्यवसायाला सुगीचे दिवस आले असून जिकडे-तिकडे सर्वत्र हेल्मेटच दृष्टीस पडत आहेत. मागील चार ते पाच दिवसांपासून जणू शहरात हेल्मेटचा महापूर आल्याचे चित्र दिसत आहे. अमरावती शहरात हेल्मेटसक्ती करण्यात आल्यानंतर पोलिस विभागाकडून हेल्मेट न वापरणाऱ्यांविरोधात दंडाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे भीतीपोटी बहुतांश नागरिक प्रामुख्याने तरुणवर्ग हेल्मेट खरेदी करीत असल्याचे चित्र आहे. हेल्मेटची अचानक वाढलेली मागणी पाहता अनेकांनी आपले भाजीपाल्याचे व्यवसाय तूर्तास बंद करून हेल्मेट विक्रीच्या नव्या व्यवसायात हात घातला आहे. एवढेच काय तर लहान-मोठ्या किराणा स्टोर्सच्या बाहेर, गल्ल्यांमध्ये, रस्त्याच्या कडेला हेल्मेटची दुकाने थाटण्यात आली आहेत. काही जणांनी हेल्मेट विक्रीसाठी खास दुकाने भाड्याने घेतली आहेत. रस्त्याच्या कडेला हेल्मेट विक्रीला ग्राहकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे, कारण दुकानाच्या तुलनेने रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या हेल्मेटच्या किंमतीमध्ये कमी जास्त करता येते. त्यामुळे नागरिकांचा कल तिकडेच अधिक आहे.

उपलब्धता भारी, मात्र दर्जाचे काय?

साधारणपणे हेल्मेट हे आयएसआय मार्कचे असावे, असा दंडक आहे. मात्र अनेक ठिकाणी आयएसआय मार्कच्या शिक्क्याचे हेल्मेट विकण्यात येत आहेत, त्यांचा दर्जा काय? असा प्रश्नसुद्धा उपस्थित होत आहे. शहरातील इर्विन चौक ते जयस्तंभ मार्गावर सर्वाधिक दुकाने थाटण्यात आली असून वाहनचालक आपल्या गाड्या थांबवून हेल्मेट खरेदी करीत आहेत. त्यामुळे आणखी काही दिवस तरी शहरात हेल्मेटचा व्यवसाय जोमात चालणार आहे.

सांगायचे ८००ला द्यायचे ३०० ला

रस्त्यालगत असलेल्या हेल्मेट विक्री सुरु असलेल्या दुकानात हेल्मेट घेण्याकरिता गेलो असता आधी त्याची किंमत ८००रु सांगतात त्यानंतर ५००रु मध्ये देण्यास तयार होतात आणि शेवटी नाहीच भाव पटला तर शेवटी ३००रु देण्यास तयार होतात मात्र हे सर्व हेल्मेट निकृष्ट दर्जाचे असून अश्या दुकानांवर कारवाई कऱण्यात यावी अशी मागणी हि काही नागरिक करीत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande