
परभणी, 31 जुलै (हिं.स.)। पाथरी विधानसभा मतदारसंघासह, गंगाखेड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात पूरग्रस्त परिस्थितीमुळे उद्भवलेल्या समस्या लक्षात घेता मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने ८ कोटी रुपयांचा निधी सर्वेक्षण करण्यासाठी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली.
परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदी व इतर नद्या, ओढ्याकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण होत असल्याने जिल्ह्यातील ११७ गांवे पुनर्वसन करण्याची गरज असून जिल्ह्यात मागील वर्षी जुलै ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नदीकाठच्या गावात पाणी शिरून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. बहुतांशी गावात बोटीद्वारे नागरिकांना इतरत्र हलविण्याचा प्रयत्न करावा लागला होता. त्यामध्ये पाथरी तालुक्यातील २०, मानवत ६, सोनपेठ १३, गंगाखेड २०, पालम २२, पूर्णा २२ व सेलू तालुक्यातील १२ गावांचा समावेश आहे. या गावांचे पुनर्वसन, निळ्या व लाल रेषा सर्वेक्षण, पुनर्वसित गावांत पायाभूत सुविधा यासाठी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे निधीची मागणी करण्यात आली होती. या दखल घेत मदत व पुनर्वसनमंत्र्यांनी गोदाकाठच्या सर्वेक्षणासाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.या सर्वेक्षणामुळे गोदाकाठावरील गावांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची प्रक्रिया सुरु करण्याबाबत शासन स्तरावरून कारवाई करण्यात येईल, असे आमदार राजेश विटेकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis