
परभणी, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। झारखंडमधील जेपीएससी व जेएसएससी परीक्षांमधील पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमितता तसेच विद्यार्थ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, परभणी महानगरच्या वतीने बुधवारी (दि. 12) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील काळी कमान परिसरात निषेध आंदोलन करण्यात आले.
झारखंडमध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थी मागील काही दिवसांपासून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करीत असल्याचे अभाविपच्या पदाधिकार्यांनी सांगितले. दि. 10 ऑगस्ट रोजी आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या फवार्यांचा वापर करण्यात आल्याचा दावा यावेळी करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवाद साधून तोडगा काढण्याऐवजी पोलिसी बळाचा वापर करणे ही लोकशाही व्यवस्थेसाठी चिंताजनक बाब असल्याचे अभाविपच्या वतीने सांगण्यात आले. यानंतर दि. 11 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांच्या मागण्या विधिमंडळापर्यंत पोहोचविण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विधानसभा घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान राष्ट्रीय महामंत्र्यांसह 200 हून अधिक अभाविप कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचा दावा संघटनेने केला.
यावेळी अभाविप देवगिरी प्रदेशातील कार्यकर्ते सुशांत एकोर्गे यांनी जेपीएससी व जेएसएससी परीक्षांमधील कथित पेपरफुटी व परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल सीबीआय चौकशी करावी, पेपरफुटी व अनियमिततेमागील दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच संबंधित परीक्षा रद्द करून पारदर्शक पद्धतीने पुन्हा घेण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
शांततेच्या मार्गाने न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे निषेधार्ह असल्याचे एकोर्गे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पोलिसी बळाऐवजी संवादातून तोडगा काढणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
अभाविप परभणी महानगर मंत्री गायत्री लाड यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण, परीक्षा आणि भवितव्याशी संबंधित प्रश्न उपस्थित करण्याचा लोकशाही अधिकार असल्याचे सांगितले. या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापर करणे हा त्यांच्या आवाजाचा अवमान असल्याचे त्यांनी म्हटले. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण करून विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने पाहावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी ‘पेपरफुटीची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे’, ‘विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध’, ‘विद्यार्थ्यांचा आवाज दाबणे बंद करा’ अशा घोषणा देत झारखंडमधील कारवाईचा निषेध केला. अभाविपच्या वतीने जेपीएससी व जेएसएससी परीक्षांमधील कथित पेपरफुटी व अनियमिततेची सीबीआय चौकशी करावी, संबंधित परीक्षा रद्द करून पारदर्शक पद्धतीने पुन्हा परीक्षा घ्यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांवरील पोलिसी दडपशाही थांबवावी तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर शासनाने तातडीने संवाद साधावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
या निषेध आंदोलनात अभाविपचे जिल्हा संयोजक दर्शन देशमुख, महानगर सहमंत्री ओमकार डोके, हरीश मोरे, महेश बडवे यांच्यासह अभाविपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis