
अकोला, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। मृद व जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकररावजी नाईक यांचा जन्मदिन २१ ऑगस्ट जलसंधारण दिनानिमित्त राज्यात १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान अकोला जिल्ह्यात जलसंधारण सप्ताह प्रभावीपणे साजरा करण्याच्या दृष्टीने संबंधित सर्व यंत्रणांनी आवश्यक ते नियोजन करून समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे याबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी मृद व जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर व विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते
महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर तसेच माती आणि पाणी संवर्धन या विषयावर रील्स स्पर्धा उपक्रमाचा आढावा घेण्यात आला.
शाश्वत विकासासाठी मृद व जलसंधारणाबाबत राज्यव्यापी जनजागृती करून जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने २१ ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर अकोला क्रिकेट क्लब ग्राउंडपासून सुरु होऊन एस टी बस स्थानक, अशोक वाटिका चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, फतेह चौक, टॉवर चौक ते पुन्हा क्रिकेट क्लब ग्राउंड असा ठरविण्यात आलेला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे