
लातूर, 12 ऑगस्ट (हिं.स.)।
नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली गठित केलेल्या पोलीस पथकाने लातूर जिल्ह्यात मटका व जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली. तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये २७ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून ६९ हजार २८० रुपये रोख, २० मोबाईल, चारचाकी व दुचाकी वाहने तसेच इतर साहित्य असा एकूण १७ लाख ८४ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिरुपती हॉस्पिटलजवळ जाणाऱ्या रोडवर राजे बार अँड रेस्टॉरंटसमोर टीन शेडमध्ये मटका बुक्कीवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत १२ हजार ६१० रुपये रोख व १९ हजार रुपयांचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले. या प्रकरणी सहा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक निजामोद्दीन शेख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
त्यानंतर विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमआयटी कॉलेज ते नवीन रेणापूर नाका परिसरात योगेश बनसोडे यांच्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण नावाच्या मटका बुक्कीवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत १९ हजार ३५० रुपये रोख व ४२ हजार रुपयांचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले. या प्रकरणी नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनसोडे यांच्या शेतातील टीन शेडच्या बाजूस जुगार खेळणाऱ्यांविरुद्धही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३७ हजार ३२० रुपये रोख, १२ मोबाईल, दोन चारचाकी व पाच मोटारसायकली असा एकूण १६ लाख ९१ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी १२ जणांना ताब्यात घेऊन अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तीनही कारवायांमध्ये एकूण २७ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून ६९ हजार २८० रुपये रोख, २० मोबाईल व इतर साहित्य असा एकूण १७ लाख ८४ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis