
१० हजारांहून अधिक विद्यार्थी आणि हजारो नागरिकांचा सहभाग
वर्ल्ड रेकॉर्ड, एशिया बुक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
डोंबिवली, १५ ऑगस्ट (हिं.स.)। स्वातंत्र्यदिनाचा उत्सव देशप्रेम, राष्ट्राभिमान आणि सामाजिक एकतेच्या अनोख्या सोहळ्यात रूपांतरित करत डोंबिवलीत १५ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि डोंबिवलीतील १०० हून अधिक सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित या रॅलीत हजारो नागरिकांनी सहभाग घेत तब्बल ३५ हजार चौरस फुटांचा विशाल तिरंगा हातात घेऊन मार्गक्रमण केले. या उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया, एशिया बुक ऑफ रेकॉर्डस, आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद करण्यात आली.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल डॉ. शिंदे यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक संस्था आणि नागरिकांचे आभार मानले.
मुसळधार पावसातही तिरंग्यासाठी उत्साह
‘तिरंगा हाती घेऊया, विश्वविक्रम घडवूया’ या संकल्पनेतून आयोजित या रॅलीला डोंबिवलीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सकाळी नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर एकत्र आले. त्यानंतर डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक (घारडा सर्कल) येथील हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सचान स्मारकाला अभिवादन करून विशाल तिरंगा घेऊन रॅलीला सुरुवात झाली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेली रॅली लोकमान्य टिळक पुतळा, चार रस्ता, नेरुरकर पथ मार्गे दत्तनगर चौकाच्या दिशेने मार्गस्थ झाली. हजारो नागरिकांच्या हातात डौलाने फडकणारा विशाल तिरंगा आणि देशभक्तीपर घोषणांमुळे संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या उत्साहाने भारून गेला.
रॅलीचा समारोप दत्तनगर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान परिसरातील १५० फूट उंच राष्ट्रध्वज स्तंभाजवळ झाला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते १५० फूट उंच ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
या ऐतिहासिक रॅलीमध्ये डोंबिवली आणि परिसरातील ५० हून अधिक शाळांमधील सुमारे १० हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. याशिवाय १०० हून अधिक सामाजिक संस्था, माजी सैनिक, स्काऊट-गाईड, एनसीसी आणि एनएसएस कॅडेट, साहित्य, कला, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध क्षेत्रांत राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर गौरविले गेलेले डोंबिवलीकर सहभागी झाले.
विविध क्षेत्रांतील सुमारे २५ हजार नागरिकांनीही या राष्ट्रभक्तीच्या सोहळ्यात सहभाग नोंदवत तिरंग्याला मानवंदना दिली.
‘युवकांनी देशाच्या विकासात योगदान द्यावे’
मुसळधार पाऊस सुरू असतानाही डोंबिवलीकरांचा उत्साह कमी झाला नाही. पावसाची तमा न बाळगता हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले. या उपक्रमातून लहान मुलांनी केवळ राष्ट्रध्वज हाती घेतला नाही, तर देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठीची जबाबदारीही आपल्या खांद्यावर घेतल्याचा संदेश दिला, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असून देशाच्या विकासाची वाटचाल अधिक वेगाने पुढे नेण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे. युवकांनी आपल्या सामर्थ्याचा आणि ज्ञानाचा उपयोग देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी करून भारताला अधिक सक्षम, आत्मनिर्भर आणि सामर्थ्यवान करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
तीन विक्रम संस्थांमध्ये नोंद
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विशाल तिरंगा रॅलीची अधिकृत विक्रम नोंद प्रक्रिया. World Records India, Asia Book of Records आणि India Book of Records यांच्या माध्यमातून या ऐतिहासिक उपक्रमाची नोंद करण्यात आली.
रॅलीच्या मार्गावर देशभक्तीपर गीते आणि घोषणांनी वातावरण भारून गेले होते. विविध ठिकाणी देशभक्तीपर गीतांचे आणि नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांपासून माजी सैनिकांपर्यंत आणि सामाजिक संस्थांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विविध घटक एकाच तिरंग्याखाली एकत्र आले.
विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारीही या रॅलीत सहभागी झाले. त्यामुळे पक्षीय भेद बाजूला ठेवून राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी सर्वजण एकत्र आल्याचे चित्र डोंबिवलीत पाहायला मिळाले.
३५ हजार चौरस फुटांचा विशाल तिरंगा, हजारो नागरिकांचा सहभाग आणि विक्रमाची अधिकृत नोंद यामुळे डोंबिवलीतील हा तिरंगा रॅलीचा सोहळा कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासातील अविस्मरणीय अध्याय ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi