
देशातील 14 राज्यांत समन्वित कारवाई; आयईडी, ग्रेनेड, पिस्तुले व काडतुसे जप्त
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट (हिं.स.) : पाकिस्तानस्थित शहजाद भट्टी नेटवर्कविरोधात सुरक्षा यंत्रणांनी देशभरात मोठी कारवाई करत 253 संशयितांना अटक केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील 14 राज्यांत समन्वयाने ही मोहीम राबविण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी ‘एक्स’वरील संदेशाद्वारे दिली.
या कारवाईत इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (आयईडी), पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरीचे चिन्ह असलेले ग्रेनेड, पिस्तुले, जिवंत काडतुसे तसेच निगराणी आणि कथित हेरगिरीसाठी वापरले जाणारे सीसीटीव्ही कॅमेरे जप्त करण्यात आल्याचे शाह यांनी सांगितले.अमित शाह यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या कथित पाठबळावर कार्यरत असलेल्या या नेटवर्कचा सुरक्षा यंत्रणांनी पर्दाफाश केला असून, त्याच्या कथित दहशतवादी कारवायांच्या योजना उधळून लावण्यात आल्या आहेत. दहशतवादाविरोधात केंद्र सरकारचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आसाममध्येही नेटवर्कचे धागेदोरे
देशव्यापी कारवाईपूर्वीच आसाममध्ये या नेटवर्कशी संबंधित कथित मॉड्यूलचा तपास सुरू होता. आसाम पोलिसांच्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी स्पेशल टास्क फोर्सने धुबरी, चिरांग आणि बारपेटा पोलिसांच्या सहकार्याने तीन जणांना अटक केली होती.या कारवाईत पाच मोबाइल फोन, सात सिमकार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, डेबिट कार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. तपासात नेटवर्कचा कथित संबंध भरती, ऑनलाइन कट्टरतावाद, रेकी, लॉजिस्टिक्स, हेरगिरी, शस्त्रांची बेकायदेशीर खरेदी, स्लीपर सेलची निर्मिती आणि दहशतवादी कारवायांना मदत यांसारख्या गतिविधींशी असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला.
पाकिस्तानस्थित हँडलर्सशी संपर्काचा आरोप
तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, नेटवर्कमधील सदस्य एन्क्रिप्टेड संवाद माध्यमांचा वापर करून पाकिस्तानस्थित कथित हँडलर्सच्या संपर्कात होते. या नेटवर्कचे विविध कथित फ्रंट संघटनांशी संबंध असल्याचाही तपास यंत्रणांचा दावा आहे.या संघटनांमध्ये खालिस्तान आर्म्ड फोर्स, पंजाब सॉवरेनिटी अलायन्स, खालिस्तान लिबरेशन आर्मी, शेर-ए-पंजाब ब्रिगेड, युनायटेड सिख ब्रदरहुड, सिख टायगर्स ऑफ खालिस्तान आणि तहरीक-ए-तालिबान हिंदुस्तान यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या आरोपांची अंतिम सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत निश्चित होणे बाकी आहे.
लक्ष्यित हत्यांमध्ये सहभागाचा आरोप
आसाम एसटीएफचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रणब कुमार पेगू यांच्या म्हणण्यानुसार, नेटवर्कचा कथित संबंध लक्ष्यित हत्यांसह विविध हिंसक कारवायांशी असल्याचे तपासात समोर आले आहे. 22 फेब्रुवारी आणि 24 मे 2026 रोजी पंजाब पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांच्या लक्ष्यित हत्यांची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान हिंदुस्तानने स्वीकारल्याचा पोलिसांचा दावा आहे.नलबारी येथील एका तपासादरम्यान या नेटवर्कचे धागेदोरे प्रथम समोर आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर 22 मे रोजी एका आरोपीला अटक करण्यात आली होती.सुरक्षा यंत्रणांच्या आरोपानुसार, नेटवर्ककडून भारतात ग्रेनेड, आयईडी आणि पेट्रोल बॉम्ब हल्ले तसेच लक्ष्यित हत्यांची कथित तयारी केली जात होती. स्थानिक नागरिकांचा वापर करून पोलीस ठाणे, लष्करी ठिकाणे आणि धार्मिक स्थळांची रेकी करण्यात आल्याचाही दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
तब्बल 80 हून अधिक एफआयआर दाखल
शहजाद भट्टी नेटवर्कविरोधात आतापर्यंत 80 हून अधिक एफआयआर दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींविरोधात यूएपीए, भारतीय न्याय संहिता (बीएनएस), शस्त्रास्त्र कायदा, एनडीपीएस कायदा आणि स्फोटक पदार्थ कायदा यांसारख्या विविध कायद्यांनुसार कारवाई करण्यात आली आहे.सुरक्षा यंत्रणांकडून नेटवर्कशी संबंधित उर्वरित संशयितांचा शोध सुरू असून, त्याचे कथित सीमापार संबंध आणि आर्थिक व लॉजिस्टिक नेटवर्क उघड करण्यासाठी तपासाला वेग देण्यात आला आहे.केंद्र सरकारने सीमापार दहशतवादाविरोधातील भारताची ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या नेटवर्कविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही सरकारने दिला आहे.---------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी