बीड : सोयाबीनच्या दरात घसरण; शेतकऱ्यांची वाढली चिंता
बीड, 18 ऑगस्ट (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनचे पीक वाढू लागले असतानाच बाजारातील सोयाबीनच्या दराने मात्र घसरणीचा मार्ग धरला आहे. काही महिन्यांपूर्वी प्रतिक्विंटल ७ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचलेला सोयाबीनचा दर आता थेट ६ हजार ६०० रुपयांवर आला आ
सोयाबीन


बीड, 18 ऑगस्ट (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनचे पीक वाढू लागले असतानाच बाजारातील सोयाबीनच्या दराने मात्र घसरणीचा मार्ग धरला आहे. काही महिन्यांपूर्वी प्रतिक्विंटल ७ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचलेला सोयाबीनचा दर आता थेट ६ हजार ६०० रुपयांवर आला आहे. त्यामुळे आगामी हंगामात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन बाजारात आल्यानंतर दर आणखी कोसळणार का, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

मागील वर्षीच्या हंगामात सुरुवातीला सोयाबीनला अत्यंत कमी, सुमारे ३ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. आर्थिक अडचणी आणि खरीप हंगामातील खर्च भागविण्याची गरज यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात सोयाबीन विकून टाकले. त्यानंतर बाजारातील आवक कमी होत गेली आणि सोयाबीनच्या दरात हळूहळू वाढ झाली. मे, जून आणि जुलै महिन्यात दर तब्बल ७ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचला. मात्र, या दरवाढीचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांच्या हातात फारसा पडला नाही. कारण त्यावेळी बहुतांश शेतकऱ्यांकडील सोयाबीन विकून झाले होते.

यंदाही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. बाजारात सध्या मोठी आवक नसतानाही सोयाबीनच्या दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे खाद्यतेलाच्या किमती वाढत असताना सोयाबीनचा दर मात्र कमी का होत आहे, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. बाजारातील दराचे हे गणित शेतकऱ्यांच्या आकलनापलीकडे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

पीक हातात येण्यापूर्वीच दराची चिंता

बीड जिल्ह्यात यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप पिकांची पेरणी दोन टप्प्यांत झाली आहे. पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या सोयाबीन पिकाला सध्या शेंगा लागत आहेत, तर दुसऱ्या टप्प्यातील सोयाबीन फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे सध्या दोन्ही पिकांसाठी पाऊस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला तरच सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाने दडी मारल्यास शेंगा पोसण्याऐवजी पापड्या होण्याची आणि फुलोरा गळून पडण्याची भीती आहे. त्यामुळे एका बाजूला पिकाच्या उत्पादनाची चिंता, तर दुसऱ्या बाजूला बाजारभावाची अनिश्चितता, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

दरवाढीचा फायदा नेमका कुणाला?

सोयाबीनचा दर कमी असताना आर्थिक गरजेमुळे शेतकऱ्यांना आपला माल विकावा लागतो. मात्र, शेतकऱ्यांकडील माल संपल्यानंतर दर वाढतात आणि बाजारात आवक वाढण्याची वेळ आली की पुन्हा दर घसरण्याचे चित्र अनेकदा दिसून येते. त्यामुळे सोयाबीनच्या दरातील चढ-उताराचा फायदा नेमका कोणाला होतो, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. “पीक बाजारात येण्यापूर्वीच दर ६ हजार ६०० रुपयांवर आला आहे. आगामी काळात मोठी आवक सुरू झाल्यानंतर हा दर आणखी किती घसरणार, याची चिंता आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य आणि स्थिर दर मिळणे गरजेचे आहे,” अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे

सध्या सोयाबीनच्या पिकासाठी पाऊस आणि बाजारभाव हे दोन्ही महत्त्वाचे प्रश्न बनले आहेत. पाऊस वेळेवर झाला तर उत्पादनाची आशा आहे. मात्र उत्पादन हातात आले तरी बाजारभाव मिळेल का, याची शाश्वती नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले असून, बाजारभावाकडेही त्यांचे लक्ष आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande