वर्धा - जिल्ह्यात पंधरवड्यापासून पावसाची दडी
वर्धा 18 ऑगस्ट (हिं.स.)। गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे खरीप पिकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आॅगस्ट महिना अर्धा अधिक संपला तरीही समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील पिकांची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. सुरवातीला च
जिल्ह्यात पंधरवड्यापासून पावसाची दडी


वर्धा 18 ऑगस्ट (हिं.स.)। गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे खरीप पिकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आॅगस्ट महिना अर्धा अधिक संपला तरीही समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील पिकांची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. सुरवातीला चांगल्या झालेल्या पावसामुळे जोमात आलेल्या पिकांची आता पाण्यासाठी दयनीय अवस्था झाली असून, संपूर्ण शेतकरी वर्गात तीव्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ऑगस्टमध्ये पावसाची सरासरी कमालीची घटली चालू पावसाळी हंगामात जून आणि जुलै महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावली हाेती. मात्र, ऑगस्ट उजाडताच पावसाने दगा दिला आहे. महिना संपत आला तरी जिल्ह्यात केवळ १५.८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, ही टक्केवारी सरासरीच्या तुलनेत केवळ ५.८ टक्के इतकी अत्यंत अल्प आहे. ऑगस्ट महिन्यातील या काेरड्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेती धोक्यात आली आहे. जूनमध्ये सरासरी १३२.२ मि.मी. पाऊस झाला, जो एकूण सरासरीच्या ७५.९ टक्के होता. या पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरण्या उरकल्या होत्या. जुलै महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली. जिल्ह्यात तब्बल २८८.८ मि.मी. पाऊस पडला, जो सरासरीच्या १०९.६ टक्के होता. या दमदार पावसामुळे पिके जोमदार आली होती. जुलै महिन्यातील दमदार पावसानंतर पिकांना आता ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज होती. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून केवळ ढगाळ वातावरण, अधूनमधून ऊन आणि पावसाचा अभाव यामुळे पिके सुकू लागली आहेत. पिकांची वाढ जागेवरच खुंटल्यामुळे चालू हंगामातील उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. जर पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर हातात आलेले पीक जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

जलाशयांत जलसाठा ८० टक्क्यांखालीच

पावसाच्या या लपंडावाचा फटका केवळ पिकांनाच नव्हे, तर जिल्ह्याच्या पाणीसाठ्यालाही बसला आहे. जुलैअखेरपर्यंत धरणांमध्ये चांगला साठा होईल अशी आशा होती. मात्र, ऑगस्ट कोरडा गेल्याने जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या जलाशयांमधील जलसाठा अजूनही ८० टक्क्यांच्या खालीच रेंगाळला आहे. वर्धा शहराला पाणीपुरवठा करणार्या धाम प्रकल्पात ६६.२६ टक्के जलसाठा आहे. आगामी काळात मोठा पाऊस न झाल्यास पिकांसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande