
अमरावती, 18 ऑगस्ट (हिं.स.)। चिखलदरा पर्यटन स्थळावर दरवर्षी पावसाळ्यात लाखो पर्यटक भेट देतात. मात्र, परतवाडा ते चिखलदरा आणि चिखलदरा ते घटांग या मार्गावरील प्रवासात पर्यटक असुरक्षित असल्याचा गंभीर धोका समोर आला आहे. या मार्गावर पावसाळ्यात दरवर्षी दरडी व मोठे दगड कोसळण्याच्या घटना घडत असतात. चिखलदरा रस्त्यालगतच्या पहाडांवर अतिशय मोठ्या आकाराचे सुटे दगड अडकलेले दिसत असून, ते कधीही मुख्य रस्त्यावर कोसळण्याची दाट शक्यता आहे, हे विशेष.
विकेंड आणि पावसाळी हंगामात चिखलदऱ्यात गर्दी होत असताना, प्रवाशांचे जीवन धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष वेधणे ही गरज बनली आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न मुख्यमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाच्या दरबारात गांभीर्याने उपस्थित केला जावा, अशी मागणी जोर धरत आहे.
उपाययोजनांची मागणी
भूवैज्ञानिक सर्वेक्षण : जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तत्काळ निर्देश द्यावेत आणि परतवाडा-चिखलदरा-घटांग रस्त्याच्या आजूबाजूच्या डोंगररांगांचे तज्ज्ञांमार्फत जिऑलॉजिकल सर्वेक्षण करावे.
कायमस्वरूपी नियोजन : रस्त्यांवर लटकलेले धोकादायक दगड हटवून भविष्यात होणाऱ्या भूस्खलनाचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात.
४ ऑगस्ट : परतवाडा-चिखलदरा- घटांग या मार्गावर ४ ऑगस्ट २०२६ रोजी अशाप्रकार मोठे दगड रस्त्यावर पडले होते.
वर्ष २०२४: चिखलदरा ते घटांग या मार्गावर सन २०२४ मध्ये भुस्खलनानंतर रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक ठप्प पडली होती.
घटांग ते डोमा या मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. मात्र, परतवाडा ते चिखलदरा या मार्गावर अतिशय थोड्या प्रमाणात दरडी कोसळतात, आणि त्या देखील प्रशासनातर्फे त्वरित हटवून हा मार्ग वाहतुकीसाठी तातडीने पूर्ववत केला जातो. जिऑलॉजिकल सव्हें होऊ शकतो, मात्र सध्या तशी गाईडलाईन नाही.
-नीलेश चौधरी, उप अभियंता, बी अँड सी.
-----------------------------------------------------------------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी